गडहिंग्लज/जगदीश पाटील
राज्यातील शिवसेनेत दुफळी पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दुसरा गट करत बंड केले. याचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र उमटले. शिंदे गटात शिवसेनेतीलच ‘इनकमिंग’ वाढल्याचे सर्वत्र दिसत असताना गडहिंग्लजला मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करणारे अधिक दिसल्याने या दुफळीला गडहिंग्लजला अगदीच मोजका प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.
गडहिंग्लज तालुक्यात शिवसेना कार्यरत असली तरी ‘ठळक’ पदापर्यंत जनतेने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कधी संधी दिल्याचे दिसले नाही. विधानसभेच्या रिंगणात शिवसेनेकडून ठळकपणे तालुक्यातील भैय्यासाहेब कुपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर आले. पण यशापर्यंत कोणालाच पोहचता आले नाही. त्यानंतर अलीकडे मात्र शिवसेनेत काहीशी मरगळ असल्याचे जाणवत होते. शिवसेनेच्या आंदोलनापासून प्रा.सुनिल शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर काहीसे लांब असल्याचे वेळोवेळी जाणवले. याची कारणे विविध असली तरी या भागात सातत्याने आंदोलन करत जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मात्र या भागात शिवसेना चर्चेत ठेवली. विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेचा आवाज शासन दरबारी पोहचवण्याचा प्रयत्न केला. हिरण्यकेशीचे प्रदूषण असो अथवा रिंगरोड विकासाचा निधी असो यासह छोटय़ा मोठय़ा आंदोलन, मागणीत शिवसेना कायम अग्रेसिव्ह राहिली. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आदि पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी राष्ट्रवादीने येथे विविध विकासकामाच्या शुभारंभाच्या वेळी शिवसेनेला काही अंतरावर ठेवल्याचे दिसत होते. अलीकडे शिवसेनेत मरगळ ही जाणवत होती. नेमके कोण काय करते ? हेच समजत नव्हते. यातून जिल्हाप्रमुख देवणे यांनी गडहिंग्लज शहराची सुत्रे संतोष चिक्कोडे यांच्या सुपूर्द केली. हा बदल केल्यानंतर काही जुणे शिवसैनिक नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. ही चर्चा असली तरी आक्रमक भुमिका कोणच घेताना दिसले नाहीत. अलीकडे मात्र राज्यात शिवसेनेत दुफळी पडल्यानंतर नाराज मंडळीनी आपला सवतासुभा ठेवत बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सागर कुराडे, मनोज पवार, अशोक शिंदे या माजी पदाधिकाऱयांबरोबर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संबंधित असणारे संजय संकपाळ यांनी एकत्र येत मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दर्शविला. त्यानंतर 24 तासात जिल्हाप्रमुख देवणे यांनी गडहिंग्लजला बैठक घेत पक्षप्रमुख ठाकरे यांच्या पाठिशी तालुक्यातील शिवसैनिक ठामपणे राहणार असल्याचे जाहीर केले. यावेळी शहर प्रमूख चिक्कोडे, तालुकाप्रमुख दिलीप माने यांच्यासह तालुक्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील प्रा. सुनिल शिंत्रे आणि संग्रामसिंह कुपेकर यांची मात्र बैठकीतील गैरहजेरी प्रकर्षानी जाणवली. याची चर्चा बैठकीनंतर सुरू झाली. राज्यात शिवसेनेत मोठी दुफळी पडून सत्तांतर झाले असले तरी गडहिंग्लजला मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठिशी जाणारे शिवसेनेचे काही मोजकेच कार्यकर्ते त्यातही माजी पदाधिकारी असल्याने शिवसेनेला राज्यातील दुफळीचा सद्यस्थितीत लक्षात घेण्यासारखा फटका गडहिंग्लज तालुक्यात बसला नाही. आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी रहाणाऱयांची संख्या तुलनेत विरोधकापेक्षा अधिक असल्याचे पहावयास मिळत आहे.