तीन महिने उलटूनही कामाला सुरुवात नाही : लाखो रुपये खर्च करूनही दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर स्मशानभूमीत बसविण्यात आलेल्या डिझेलवर चालणाऱया शवदाहिनीचे परिवर्तन गॅसवर चालणाऱया शवदाहिनीत करण्यात येणार आहे. सदर कामकाज लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती मेघा गॅस कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली होती. मात्र तीन महिने उलटले तरी शवदाहिनीच्या कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने हे काम रखडले आहे.
सदाशिवनगर स्मशानभूमीत डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसविण्यासाठी 45 लाखाचा खर्च करण्यात आला होता. मात्र अंत्यविधीसाठी 60 लिटरहून अधिक डिझेल लागत आहे. तसेच अंत्यविधीसाठी चार ते पाच तास वेळ लागत असल्याने ही शवदाहिनी बंद ठेवण्यात आली होती. दुरुस्ती करण्यासाठी काही कंपन्यांना निमंत्रण देण्यात आले होते. पण दुरुस्तीऐवजी गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्यात यावे, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे निवेदन देऊन केली होती. याची दखल घेत महापालिकेच्या अभियंत्यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता.
बेंगळूर येथील कंत्राटदारांनी दुरुस्तीसाठी 55 लाखाहून अधिक खर्च असल्याचे अंदाजपत्रक महापालिकेकडे सादर केले होते. यापूर्वी नवीन शवदाहिनीसाठी 45 लाख रुपये खर्च करण्यात आला असताना या शवदाहिनीच्या दुरुस्तीसाठी 55 लाख खर्च येणार असल्याचे सांगण्यात आल्याने आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी शवदाहिनीची पाहणी करून गॅस शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्यासाठी अन्य कंपन्यांकडून माहिती घ्या, अशी सूचना केली होती. याचदरम्यान सदर शवदाहिनीच्या दुरुस्तीचे काम करून देण्याची तयारी मेघा गॅस कंपनीने दर्शविली.
डिझेल शवदाहिनी धूळखात
डिझेल शवदाहिनीचे गॅस शवदाहिनीमध्ये रुपांतर करण्यासाठी मेघा गॅस कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करून कामकाज सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पण पाहणी करून 3 महिने झाले तरी शवदाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. त्यामुळे हे काम रखडले आहे. लाखो रुपये खर्च करून बसविलेली शवदाहिनी सध्या धूळखात पडली आहे. या ठिकाणी जमा केलेल्या स्क्रॅपप्रमाणेच डिझेल शवदाहिनीची अवस्था झाली आहे. या शवदाहिनीचे परिवर्तन कधी होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.