बातम्या प्रसिद्धीनंतर यंत्रणा झाली जागी : तीन दिवसांपासून सुरू होता वणवा
प्रतिनिधी / धारबांदोडा
धारबांदोडा येथील सिद्धा डोंगरावर लागलेली आग विझविण्यासाठी गुऊवारी सकाळपासून सुरूवात करण्यात आली. यात अग्निशामक दलाचे जवान, मामलेदार, कर्मचारी, वन कर्मचारी व स्थानिक युवकांचा समावेश आहे.
आगींच्या घटनाबाबत वर्तमानपत्रात बातम्या झळकल्यानंतर खळबळून जागे झालेल्या संबंधित यंत्रणेने आग विझविण्याचे काम हाती घेतले असून सुमारे 40 लोकांचा यात समावेश आहे. यावेळी धारबांदोडा मामलेदार लक्ष्मीकांत कुर्टीकर, वनाधिकारी विकास चोडणकर, कुळे वनक्षेत्राचे अधिकारी जयराम गावस, सरपंच विनायक गावस, पंचसदस्य महेश नाईक आदी उपस्थित होते.
प्राथमिक स्तरावर आग पुढे सरकू नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. विकास चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्यासाठी दोन गट तयार करण्यात आले असून यात सुमारे 25 वन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय मामलेदार कार्यालयाचे कर्मचारी, संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी व स्थानिक युवकांचा व अग्निशामक दलाच्या जवानांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
सरकारी यंत्रणा सुस्त असल्याने आग वाढली
गेल्या तीन दिवसांपासून सिद्धा डोंगरावर आगीचे तांडव सुरू आहे. या आगीला गुरखे येथून सुरूवात झाल्याचे बोलले जात असून वेळीच उपाययोजना केली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आग पसरली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे. जरी आग विझवण्याचे काम हातात घेण्यात आले असले तरी आगीवर नियंत्रण किती दिवसात येईल हे यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अनमोड घाटाच्या जंगलात आग लागल्याचा प्रकार घडला असून याबद्दल मोले वन्यजीव विभागाचे अधिकारी सिद्धेश नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. जंगलात लागलेल्या आगीमुळे रानटी जनावरे व जैव संपत्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे.