आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक करण्यासाठी प्रयत्न : नंदगड येथील परिसर पर्यटनासाठी देशाच्या नकाशावर येणार
विवेक गिरी /खानापूर
नंदगड येथे ज्या ठिकाणी संगोळ्ळी रायण्णा यांना फाशी दिली. त्या जागेचा ऐतिहासिक स्थळ म्हणून विकास करण्यात येत आहे. येथे भव्य असे स्मारक उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आशिया खंडातील पहिले ऐतिहासिक स्थळ व्हावे, यादृष्टीने कर्नाटक सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यासाठी संगोळ्ळी रायण्णा प्राधिकरण स्थापन केले असून या प्राधिकरण मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच स्मारकाचे काम सुरू आहे.
यासाठी 220 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यादृष्टीने परिसराचा विकास होत आहे. आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बोम्माई यांनी दिले आहे. नंदगडजवळील जंगल परिसरात रायण्णा यांना फाशी दिलेल्या ठिकाणी 14 एकर जागेत हे स्मारक उभारण्यात येत आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत किल्ल्याच्या तटबंदी स्वरूपात बांधण्यात आलेली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयात संगोळ्ळी रायण्णांचा जीवनपट दाखविण्यात येणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी संगोळ्ळी तसेच संपगाव ही गावे उभारण्यात येत आहेत. यात रोगाप्पाचे घर, कुलकर्णी यांचे घर यासह इतर काही इमारती उभारण्यात आल्या आहेत. हंडिभडंगनाथ मठ, ढोरी तलाव, कमल तलाव तसेच धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालय यासह अन्य वास्तू उभारल्या गेल्या आहेत. दगडी मंडप उभारण्यात आला असून मंडपात संगोळ्ळी रायण्णा यांच्या जीवनातील काही प्रसंग दगडात कोरण्यात येत आहेत.
सद्या 50 कोटींच्या कामाला चालना
संगोळ्ळी रायण्णा स्मारकाचे काम पुणे येथील शिर्के बिल्डर्स यांना देण्यात आले आहे. यातील 120 कोटी संगोळ्ळी रायण्णा शाळेसाठी वापरण्यात येणार आहेत. तर 5 कोटी कमल तलावाच्या विकासासाठी तसेच नंदगड येथे समाधीस्थळाच्या शेजारी धर्मशाळा बांधण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेले काम हे 50 कोटींचे असून यात तटबंदी, इमारती, युद्धातील प्रसंग यासह काही स्मारके येथे उभारण्यात येत आहेत.
युद्धा प्रसंगाच्या प्रतिकृतीची निर्मिती
या ठिकाणी भव्य थिएटर निर्माण करण्यात आले आहे. यात सेवन डी ईफेक्ट लेजरद्वारे संगोळ्ळी रायण्णा यांचा जीवनपट दाखविण्यात येणार आहे. हे काम जर्मनीतील कंपनीला दिले आहे. तेथे युद्धस्वार, घोडे, हत्ती यांचीही उभारणी करण्यात आली आहे. तसेच वाचनालयही सुरू करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी हॉटेल व्यवस्थाही करण्यात येत आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या आत तिकीट घरही निर्माण करण्यात येणार आहे.
संगोळ्ळी रायण्णा यांना फाशी दिलेले ठिकाण तसेच त्यांच्या समाधी स्थळावर होत असलेल्या विकासामुळे नंदगड हे देशपातळीवर पर्यटनस्थळ म्हणून निश्चितच गणले जाणार आहे.
संगोळ्ळी रायण्णांच्या जन्म-मृत्यू तारखेचा योगायोग
संगोळ्ळी रायण्णांचा जन्म 15-08-1796 साली संगोळ्ळी येथे झाला. तर त्यांना ब्रिटिश सरकारने 26 जानेवारी 1831 रोजी नंदगड येथे जंगलाच्याशेजारी वडाच्या झाडावर फाशी देण्यात आली. देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन नंतर अमलात आला. या तारखांचा हा योगायोग म्हणावा लागेल.