प्रतिनिधी/अक्कलकोट
अक्कलकोट शहरासह तालुक्यात चोरीच्या घटना वारंवार घडत असून पोलिसांसमोर चोरट्यांनी एक आव्हानच दिले आहे. दहिटणे येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरातील सोन्याचे दागिने व रोकड असे ६६ हजार पाचशे रुपये मुद्देमालावर हात साफ केले. ही घटना दहिटणे येथील राधिका अर्जुन माने यांच्या घरात घडली.याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि १८ ते १९ ऑक्टोबरच्या काळात राधिका अर्जुन माने यांच्या राहत्या घरातून कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ३० हजार किंमतीचे सोन्याचे गंठन, १६ हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्याची चैन व २० हजार रोकड असा ६६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोबारा केला. या घटनेची फिर्याद राधिका अर्जुन माने यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार राजाराम फुलारी हे करीत आहेत.