वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातमधील अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियम उडविण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अहमदाबाद गुन्हा शाखेच्या पोलिसांनी बुधवारी केली. या स्टेडियमवर येत्या शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आली होती, अशी माहिती अहमदाबाद पोलिसांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. मात्र ही व्यक्ती मध्यप्रदेशातील असून सध्या गुजरातमधील राजकोट शहराच्या एका उपनगरात वास्तव्यास असल्याची माहिती देण्यात आली आहे. या धमकीनंतर अहमदाबाद स्टेडियमची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 11 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक संपर्क यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.