सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. पुलवामाच्या द्राबगाम भागात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. शनिवारी रात्री उशिरा एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, तर इतर दोन दहशतवादी रविवारी सकाळी झालेल्या कारवाईत ठार झाले.
आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले सर्व दहशतवादी स्थानिक होते आणि ते लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. कंठस्नान घालण्यात आलेल्यांपैकी एकाचे नाव जुनैद शिरगोजरी असे असून तो 13 मे रोजीच्या हुतात्मा कॉन्स्टेबल रियाझ अहमद यांच्या हत्येमध्ये सामील होता. पुलवामा जिह्यातील फाजील नजीर भट आणि इरफान मलिक अशी अन्य दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून दोन एके-47 रायफल आणि एक पिस्तूलसह दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.