देवेंद्र फडणवीस, डॉ. भागवत कराड, चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी /सातारा
येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षांत सोहळा रविवार 5 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
या सोहळ्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील 1227 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील जनतेला मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण मिळावे, या उद्देशाने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी सन 1982 साली कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर 1983 साली कृष्णा नर्सिंग विज्ञान संस्थेची व 1984 साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. 2005 साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला. स्व. जयवंतराव आप्पांची दूरदृष्टी आत्मसात केलेल्या डॉ. सुरेश भोसले यांनी केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही कृष्णा अभिमत विद्यापाठाचा नावलौकिक पोहचविला आहे.
दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील मेडिसिन अधिविभाग (476), नर्सिंग (297), दंतविज्ञान (184), फिजिओथेरपी (128), अलाईड सायन्स अधिविभाग (80) आणि फार्मसी (62) अशा सहा अधिविभागांतून एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बी. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बी. फार्मसी आदी अभ्यासक्रमांच्या एकूण 1227 विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी प्रदान केली जाणार आहे. यापैकी 8 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांचे वितरण करून गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर यांनी दिली आहे.