वार्ताहर/ पाटण
रविवारी रात्री उशिरा पाटण तालुक्यात सात व्यक्तींना कोरोनाची लागन झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्नांची संख्या आता तब्बल 80 वर जावून पोहोचली आहे. आत्तापर्यंत यापैकी तब्बल साठ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून यात चौघांचा मृत्यू तर उर्वरित सोळा बाधीतांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी नव्याने आणखी चोवीस व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी दिली. दरम्यान या बाधीतांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदींना पाटण येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
रविवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह अहवालात कोयना विभागातील गोवारे येथील दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय कोयनानगर येथे एक महिला, हावळेवाडी, पाळेकरवाडी, बागलवाडी ( तळमावले ) येथील प्रत्येकी एक पुरूष अशा सात व्यक्तींना कोरोनाची लागन झाली आहे. या सर्व रूग्नांना तातडीने कृष्णा हॉस्पीटल कराड येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदींना पाटण येथील प्रियदर्शनी महिला वसतीगृह व कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रविवारी भालेकरवाडी तर सोमवारी उरूल व जांभेकरवाडी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोनामुक्त या रूग्नांना घरी सोडण्यात आले तथापी जांभेकरवाडी येथील कोरोनामुक्त व्यक्तींची होम क्वारंटाइनची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये आणण्यात आले आहे.
तालुक्यात एकूण कोरोना बाधीतांची संख्या 80 इतकी झाली असून त्यापैकी 60 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित सोळा रूग्नांपैकी 14 बाधीतांवर कृष्णा हॉस्पीटल कराड व दोघांवर सिव्हिल हॉस्पीटल सातारा येथे उपचार सुरू आहेत. यापुर्वीच्या प्रलंबित 47 स्वॅब नमुने अहवावापैकी चाळीस निगेटिव्ह तर सात पॉझिटीव्ह आले आहेत. सोमवारी नव्याने 24 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत त्यांचे अहवाल मंगळवारी रात्री येण्याच्या शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत.