10 एलईडी टीव्ही हस्तगत, मावशीच्या घरात लपवला होता चोरीचा माल
प्रतिनिधी / मिरज
शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या आकाश इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे गोडाऊन फोडून तब्बल 22 एलईडी टीव्हीची चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी 24 तासात गजाआड केले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या दहा एलईडी असा 1 लाख, 58 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर चोरट्यांनी चोरून नेलेला मुद्देमाल मावशीच्या घरात लपवून ठेवला होता.
अमीर महंमद शेख (वय 29, रा. अर्बन कॉलनी, सुभाषनगर), रियाज उर्फ मुर्गी बडेसाब शेख (वय 29, रा. म्हैसाळ रोड) तरबेज महंमद शेख (वय 24, रा. ख्वाजा झोपडपट्टी, मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. सदर तिघांनी चोरी करून चोरीचा माल त्यांची मावशी फातिमा सिकंदर तारळेकर हिच्या घरात लपवून ठेवला होता.
रविवारी रात्री मिरासाहेब दर्ग्याच्या पाठीमागे स्टेशन रोडवरील आकाश फॅशन स्टुडिओच्या मागील बाजूस आकाश इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे गोडाऊन फोडून वेगवेगळ्या कंपन्यांचे 22 एलईडी टीव्ही चोरीस गेले होते. तशी फिर्याद दुकान मालक सूरज पंजवानी यांनी शहर पोलिसात दिली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी 24 तासात चोरट्यांना पकडले. प्रत्यक्षात चार लाख रुपये किमतीच्या 22 एलईडी टीव्ही चोरीस गेल्या होत्या. चोरट्याकडे मात्र केवळ 10 एलईडी टीव्ही असा 1 लाख , 58 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. पुढील तपास सुरू आहे.