वाई / प्रतिनिधी :
खावली-वाई रस्त्यावर मेणवली येथे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या चौघांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एका मोटारीसह दोन लाख 74 हजार 960 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशाल बबन घोलप (वय 21 रा. ओहळी, ता. वाई), कुमार पोपट धोत्रे (32 रा. गुरेबाजार झोपडपट्टि, सिध्दनाथवाडी, वाई), संजय दिनकर वाडकर (39, रा. ओहळी, राजेश विष्णू चिकणे (20 रा. कोरले ता. भोर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वाई शहरात पेट्रोलिंग करत असताना भोर खावली वाई रस्त्यावर अवैध दारू विक्री करण्यासाठी मोटारीतून वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना मिळाली. याप्रमाणे खावली धोम-वाई रस्त्यावर मेणवली गावच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना मारुती इको गाडी क्रमांक एम एच 11 सीडब्लू 4913 ही अवैध दारूचे बॉक्स विक्रीकरिता घेऊन जात असताना पकडण्यात आली. पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे व सहकाऱ्यांनी कारवाई केली.