काकडी आपल्या सर्वांना परिचित आहे. उन्हाळ्यात तर तिला प्रचंड मागणी असते. शिवाय दैनंदिन आहारातही तिचा समावेश असतोच. या काकडीचे वजन किती असते याचा आपण फारसा विचार करत नाही. कारण तसा विचार करण्याइतकी ती वजनदार नसतेच. पण अमेरिकेतील विन्स सजोडिन नामक भाज्या उत्पादकाने विक्रमी वजनाच्या काकडीची उगवण केली असून या काकडीचे वजन तब्बल 30 पौंड, अर्थात 13.61 किलो इतके आहे. या काकडीने 2015 मध्ये डेव्हिड थॉमस यांनी उत्पादित केलेल्या काकडीचा विक्रम मोडला आहे.
सजोडिन यांच्या नावावर आणखी एक असा विक्रमही आहे. त्यांनी जगातील आतापर्यंतचा वजनदार मेरॉचे उत्पादनही केले आहे. त्याचे वजन 116.4 किलो भरले होते. ते अशा वजनदार भाज्यांचे उत्पादन कसे करु शकतात, असा प्रश्न विचारला जात आहे. भाजीच्या मुळांना ताजी हवा मिळण्याची व्यवस्था केल्यास हे घडू शकते असे ते स्पष्ट करतात. मात्र, त्याचप्रमाणे आपले एक गुप्त सूत्रही त्यांनी विकसीत केले आहे, ज्याच्या साहाय्याने कोणत्याही फळाचे किंवा भाजीचे घनफळ मोठ्या प्रमाणात वाढविता येते. हे गुपित मात्र त्यांनी तसेच ठेवले आहे.