वार्ताहर /किणये
विठ्ठल गल्ली, हंगरगा येथील कृष्णाबाई कल्लाप्पा पार्लेकर यांचे राहते घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी पहाटे पावणे सहाच्या दरम्यान घर कोसळले असून, सुदैवाने जीवितहानी टाळली. कृष्णाबाई या एकट्याच घरात राहतात. गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत ढासळली होती. रविवारी पहाटे भिंत कोसळण्याचा आवाज आल्यामुळे त्या घरातून बाहेर पळून आल्या. त्यामुळे त्या बचावल्या. त्यांना दोन विवाहीत मुली आहेत. घर कोसळल्यामुळे त्यांचा निवाराच नाहीसा झाला आहे. प्रशासनाने या नुकसानग्रस्त महिलेला मदत करावी अशी मागणी होत आहे.