15 प्रवासी किरकोळ जखमी : 5 जणांवर उपचार
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या तीन दिवसांपासून बेळगाव शहर व परिसरात संततधार सुरूच आहे. भर पावसात परिवहन मंडळाची बस उलटल्याची घटना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ क्रॉसजवळ रविवारी दुपारी घडली. या अपघातातून चालक व वाहकासह 39 प्रवासी सुखरुप बचावले आहेत, तर 5 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
महेश अरविंद बाजरे (वय 46) रा. सवनूर, परशराम रामा चौगुले (वय 63) रा. संभाजी गल्ली, बेळगाव, चंद्रशेखर चन्नबसाप्पा हुबळी (वय 44) रा. कलघटगी-धारवाड, रेखादेवी पिंटू मेस्त्राr (वय 34) रा. शिवाजीनगर-धारवाड, विठ्ठल सिद्धाप्पा पुकटे (वय 22) रा. जागनूर, चिकोडी अशी जखमींची नावे असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. केए 27, एफ 0815 क्रमांकाची परिवहन मंडळाची बस विशाळगडहून हावेरी जिल्हय़ातील हिरेकेरुरला जात होती. बडेकोळ्ळमठ क्रॉसजवळ भर पावसात चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याशेजारी कलंडली. केवळ सुदैवाने 39 प्रवासी सुखरुप बचावले.
घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. किरकोळ जखमी प्रवाशांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. बसचा दरवाजा उघडून प्रवासी कसेबसे बाहेर पडले. अपघातानंतर निकामी झालेली बस पेनच्या साहाय्याने उचलून बाजूला सारण्यात आली.
जखमींनी दिलेल्या माहितीनुसार बागेवाडी घाटात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस दुभाजकाला ठोकरून रस्त्याशेजारी कलंडली. सुमारे 15 जणांना किरकोळ दुखापती झाल्या. त्यातील 5 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत.