वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांचीही नियुक्ती
प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग येथे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी तसेच गर्दी, अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी ट्रफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. याबरोबरच येथे ट्रफिक पोलिसाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. बेम्को क्रॉस येथे उभारलेल्या या ट्रफिक सिग्नलमुळे पुढे तिसऱया रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीही काही अंशी कमी झाली आहे.
उद्यमबाग परिसरात औद्योगिक वसाहत असल्यामुळे कामगारांची संख्याही हजाराच्या पटीत आहे. दररोज कामावर येणाऱया वाहनांची संख्या अधिक असते. तसेच गोवा राज्याला जोडणारा हा महामार्ग असल्यामुळे नेहमीच या भागात वर्दळ असते. सकाळी साडेआठ ते साडेदहापर्यंत व सायंकाळी चार ते साडेसहापर्यंत मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे लहान-सहान अपघात होत असतात. मोठ-मोठे अवजड वाहन या भागांमध्ये या चौकात वळण घेऊन अंतर्गत असणाऱया कारखान्यांमध्ये मालपुरवठा करत असतात.
मात्र वाहतुकीतील बेशिस्तपणा आणि घाईगडबड यामुळे येथे वारंवार ट्रफिक कोंडी होत असते. याचा विचार करून गेल्या पंधरा दिवसापासून उद्यमबाग येथील बेम्को क्रॉस येथे ट्रफिक सिग्नल कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सिग्नलमुळे थोडा उशीर होत असला तरी शिस्तबद्धरित्या वाहतूक होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. याअगोदर थर्ड गेट येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. पण बेम्को क्रॉस येथे सिग्नल बसवल्यामुळे थर्डगेटला होणारी वाहतूक कोंडी आता काही प्रमाणात कमी झाली आहे. ट्रफिक सिग्नल बसवल्यामुळे काही वाहनधारक उद्यमबागमधील अंतर्गत रस्त्याचा वापर करून बाहेर पडत आहेत. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे.