वृत्तसंस्था/ अल रयान, कतार
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गट ड मधील मंगळवारी झालेल्या सामन्यात टय़ुनिशियाने युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या डेन्मार्कला गोलशून्य बरोबरीत रोखले.
या सामन्यासाठी टय़ुनिशियन समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. या स्पर्धेत अरबमधील एकूण चार संघ सहभागी झाले असून सौदी अरेबियानंतर टय़ुनिशियाने सामना अनिर्णीत राखत मोठी अचीव्हमेंट केली आहे. सौदीने तर बलाढय़ अर्जेन्टिनाला पराभवाची धूळ चारत खळबळ माजवली. टय़ुनिशियाला मध्यंतराआधी गोल करण्याची संधी मिळाली होती. पण डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर श्मीचेलने अप्रतिम बचाव करीत त्यांची संधी वाया घालवली. या सामन्यात डेन्मार्कच्या ख्रिस्तियन एरिकसनने दीड वर्षांनंतर पुनरागमन केले. युरो 2020 मध्ये त्याला हृदयविकाराचा धक्का झटका आला होता. उत्तरार्धात त्याने लांब पल्ल्यावरून गोलच्या दिशेने शानदार फटका मारला होता. पण टय़ुनिशियन गोलरक्षकाने तो थोपविल्याने त्याला यश मिळाले नाही.