हुपरी,वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील चंदेरी नगरी हुपरी येथे सालाबादप्रमाणे ‘गोकुळ अष्टमी’निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा , हुपरी शहर व वंदे मातरम बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख एकावन्न हजार रुपये बक्षिसाची भव्य ‘लक्ष्य दहीहंडी’ सोमवार ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. हिंदू सणांपैकी अती महत्वाचा सण ‘गोकुळ अष्टमी’ उत्सव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हुपरी येथे मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा केला जाणार असून, हुपरी येथील हुतात्मा स्मारक मैदानावर या मानाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख तथा गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी दिली.
शिवसेनेच्या होणाऱ्या लक्ष्य दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर व माजी पालकमंत्री विद्यमान आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.या सोहळ्यास माजी आमदार उल्हास पाटील,सत्यजित पाटील,सुजित मिणचेकर,गोकुळ दुध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे,माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्यासह हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित असणार आहेत.
शिवसेनेच्या भव्य ‘लक्ष्य दहीहंडी’ उत्सवाचा जल्लोष द्विगुणित करण्यासाठी जिल्ह्यातील तमाम हिंदूप्रेमी,शिवप्रेमी, गोविंदाप्रेमी नागरिकांनी व ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्व शिवसैनिक बंधू-भगिनींनी दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले आहे.