झाडांची पडझड : दिवसभर ढगाळ हवामान
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा तालुक्यासह शेजारील धारबांदोडा तालुक्यातील विविध भागात गुऊवारी पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागात जोरदार तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. वाऱ्यामुळे किंचत पडझडही झाली. गुऊवारचा पूर्ण दिवस ढगाळ हवामान राहिल्याने वातावरणातील गारव्यामुळे वाढत्या उष्मापासून काहीसा दिलासा मिळाला. बुधवारचा पूर्णदिवस उष्णतेचा पारा वाढल्याने असह्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. रात्री आसमंतात ढग दाटून आले व पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या. धारबांदोडा तालुक्यातील काही भागांमध्ये बुधवारी सायंकाळी पाऊस पडला. फोंडा शहरासह बोरी, शिरोडा, बेतोडा, सावईवेरे, उसगांव, केरी, तळावली, दुर्भाट, बांदोडा, मडकई आदी भागात पहाटेच्यावेळी कमी अधिक प्रमाणात पाऊसधारा कोसळल्या. काही भागात मेघगर्जना व लखाखत्या विजांसह तासभर पाऊस पडला. सकाळी सर्व रस्ते ओलेचिंब व वातावरणात गारवा निर्माण झाला.
झाडांची पडझड, वीज प्रवाह खंडित
पावसासह काही भागात आलेल्या किंचित वादळीवाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली. फर्मागुडी येथील जीव्हीएम कॉलेजजवळ फोंडा पणजी महामार्गावर वृक्ष कोसळल्याने वाहतूक खोळंबली. बोरी येथील नारायण मंदिराजवळ सुभाष नाईक यांच्या दुकानावर आंब्याची मोठी फांदी पडल्याने छप्पराची हानी झाली. धारबांदोडा येथे साकोर्डा रस्त्यावर गुलमोहराचे झाड पडल्याने वाहने अडकून पडली. सकाळी कामावर निघालेले लोक व अन्य प्रवासी त्यात अडकले. वीज तारांवर हे झाड पडल्याने एकदोन खांब कोलमडले. त्यामुळे धारबांदोड्यातील काही भागात दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिला. अनमोड घाटातही दोन ठिकाणी रस्त्यात झाडे पडली. फोंडा अग्नीशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यांवरील झाडे हटविली.
गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावर
फोंडा शहरासह तालुक्यातील काही पंचायतींमध्ये मोन्सूनपूर्व गटारे उपसण्यात न आल्याने पावसाचे पाणी तुंबून राहिले. येत्या आठवड्यात मोन्सूनच्या पावसाला सुऊवात होण्याची शक्यता असून त्यापूर्वी गटारांची साफसफाई न झाल्यास रस्त्यांवर पाणी साचून ते घरा व दुकानांमध्ये शिरण्याची शक्यता आहे.