वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताला सेमीकंडक्टर उद्योगातील प्रमुख खेळाडू म्हणून स्थापित करण्यासाठी, सरकार वेदांत-फॉक्सकॉन संयुक्त उपक्रमाच्या चिप्स बनवण्याच्या योजनेला मंजुरी देऊ शकते. 10 अब्ज डॉलर भारतीय सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत या संयुक्त उपक्रमाच्या योजनेला सरकार आपली मान्यता देऊ शकते.
त्यांनी 40 एनएम चिप्स बनवण्याची योजना आखली आहे – त्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील. आम्ही त्यांना मंजुरी देणार आहोत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
लवकरच मंजुरी मिळू शकते
वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर्स लिमिटेडने तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी अमेरिकन कंपनी ग्लोबल फॉन्ड्रीज आणि युरोपियन चिप निर्माता एसटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सोबत प्रारंभिक करार केला आहे. या दोघांचा तपशील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले, की सरकारने व्हीएफएसएलला दोन कंपन्यांमध्ये बंधनकारक तंत्रज्ञान हस्तांतरण करार सामायिक करण्यास सांगितले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, आयएसएमसाठी नोडल मंत्रालय म्हणून काम करणाऱ्या आयटी मंत्रालयाने ग्लोबल फाउंड्रीज आणि एसटीमाइक्रोला व्हीएफएसएलमध्ये भाग घेण्यास सांगितले आहे. त्यांनी आमचा सल्ला सकारात्मक घेतला आहे. आम्ही या प्रस्तावावर त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.