अजितदादा गटातील आमदारांच्या भेटीबाबत पवार अनभिज्ञ
ऑनलाईन टीम / मुंबई :
अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या मंत्र्यांनी काल अचानक शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आज पुन्हा अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीसाठी वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहचला. दरम्यान, शरद पवार वाय. बी. सेंटरवर पोहचताच त्यांनी माध्यमांचे प्रतिनिधी का जमलेत? अशी विचारणा आ. जितेंद्र आव्हाड यांना केली. यामधून अजित पवार गटातील आमदारांच्या भेटीबाबत पवार अनभिज्ञ असल्याचे समोर आले.
वाय. बी. चव्हाण सेंटरवर आज दुपारी शरद पवार गटातील आमदारांची बैठक होती. या बैठकीसाठी शरद पवार येणार होते. याची माहिती अजित पवार गटाला होती. त्यामुळे पवार येण्याआधी आपण जाऊन बसावं, अशी खेळी अजित पवार गटाकडून खेळण्यात आली. दरम्यान, काही वेळात शरद पवारांचे या ठिकाणी आगमन झालं. माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून त्यांनी आव्हाडांकडे यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार भेटायला आल्याचे समजले. त्यांनी त्या आमदारांना भेट नाकारली. तसेच आपल्या आमदारांना प्रदेश कार्यालयात जमण्यास सांगितले. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेतली असून, तिन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे.