33 हजार चौकिमीमध्ये फैलावली आग : हे क्षेत्र बेल्जियमपेक्षा मोठे : लाखो लोकांचे स्थलांतर
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या जंगलांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा वणवा पेटला आहे. येथील सुमारे सर्व 10 प्रांत आणि शहरांमध्ये या वणव्याचा प्रभाव दिसून येत आहे. तर ऑगस्टपर्यंत स्थिती आणखी बिकट होऊ शकते अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत सुमारे 33 हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र जळून गेले आहे. मागील 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण 13 पट अधिक तर बेल्जियमच्या एकूण क्षेत्रफळापेक्षाही मोठे आहे. या वणव्यामुळे 1 लाख 20 हजारांहून अधिक जणांना घर सोडावे लागले आहे.
कॅनडात सध्या 413 जंगलांमध्ये आग लागली असून यातील 249 ठिकाणी स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. याचा धूर आता कॅनडासोबत अमेरिकेच्या अनेक प्रांतांमध्येही फैलावू लागला आहे. न्यूयॉर्क, मिनेसोटा, क्वीन्स आणि मॅसाचुसेट्समध्ये एअर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अनेक देशांकडून मदत
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांचे हजारो अग्निशमन कर्मचारी मदतीसाठी कॅनडात पोहोचले आहेत. लोकांसाठी ही स्थिती भयावह आहे, अनेक जणांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे. आम्ही स्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत असे उद्गार कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काढले आहेत.
यापूर्वी कॅनडाच्या नोवा स्कोटिया प्रांतातील जंगलांमध्ये लागलेल्या आगीवर बऱ्याचअंशी नियंत्रण मिळविण्यात आले होते. तेथे वणव्यामुळे 200 घरं जळून खाक झाली आहेत. तर सुमारे 16 हजार लोकांना घर सोडावे लागले आहे. क्यूबेकमध्ये 164 ठिकाणी आग भडकली असून 10 हजार लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले आहे.