एलेना रायबाकिनाला नमवून मिळविला कारकिर्दीतील पहिलाच ग्रँडस्लॅम किताब
वृत्तसंस्था/ मेलबॉर्न
ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिलांच्या एकेरीच्या रॉड लेव्हर एरिना येथे शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत एरिना सबालेन्काने सध्याची विम्बल्डन विजेती कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करून आपले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. बेलारूसच्या 24 वर्षीय सबालेन्काची एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच खेप होती. तरीही आणि सुरुवातीचा सेट हरून देखील तिने हे यश मिळविले.
यंदाच्या वर्षात सबालेन्काने खेळलेले 11 ही सामने जिंकले असून त्यात तिने गमावलेला एकमेव सेट हा शनिवारच्या अंतिम लढतीतील राहिला. तिने आक्रमक शैलीत खेळ करताना 51 गुण मिळवून देणारे फटके हाणले. हे प्रमाण तिच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 20 ने जास्त राहिले. तिने सात ‘डबल फॉल्ट्स’वर मात करताना 17 बिनतोड सर्व्हिस केल्या आणि रायबाकिनाची सर्व्हिस तीनदा भेदण्यात यश मिळवले. यापैकी शेवटची सर्व्हिस साबालेन्काने तिसऱया सेटमध्ये 4-3 अशी आघाडी मिळविलेली असताना भेदली. त्याच दमात पुढे वाटचाल करत तिने सामना आपल्या नावावर जमा केला. हा सामना जवळपस अडीच तास चालला.
पाचव्या मानांकित सबालेन्काने ‘डबल फॉल्ट’ करून सर्व्हिस भेदण्याची संधी दिल्यानंतर रायबाकिनाने सुरुवातीच्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर साबालेन्काने लगेचच कझाकस्तानच्या प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणताना तिची सर्व्हिस भेदली. पण सबालेन्काने पाचव्यांदा ‘डबल फॉल्ट’ केला आणि रायबाकिनाने हा सेट आरामात गुंडाळला. तिसऱया सेटमध्ये सबालेन्काने सारा जोर लावताना रायबाकिनाच्या बचावाला वेळोवेळी भेदत 5-3 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर तिने एका मॅचपॉईंटवर ‘डबल फॉल्ट’ केला खरा, पण शेवटी सामना आपल्या बाजूने झुकवण्यात यश मिळविले.
ग्रँडस्लॅम किताब जिंकणारी पहिली तटस्थ खेळाडू
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे आणि बेलारूसने रशियाला समर्थन दिलेले असल्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रशियन आणि बेलारूसच्या खेळाडूंना राष्ट्रीय संलग्नग्नतेशिवाय वैयक्तिक स्तरावर खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सबालेन्का ग्रँड स्लॅम जिंकणारी पहिली तटस्थ टेनिसपटू बनली आहे.
यंदाच्या या 11 व्या विजयाचा अर्थ असा आहे की, सबालेन्का आता इगा स्विटेकच्या मागे जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर पोहोचेल आणि हा तिला आजवरच्या कारकिर्दीत प्राप्त झालेला सर्वोच्च क्रमांक राहील. मानसिक स्थैर्य आणि सर्व्हिस याबाबतीत घडविलेल्या सुधारणांचा तिला झालेला फायदा शनिवारी स्पष्टपणे दिसून आला.