बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी तीव्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) प्रमुख बृजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा जंतरमंतरवर पोहोचले आहेत. 7 महिला कुस्तीपटूंनी सिंह यांच्याविरोधात पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. तीन महिने उलटल्यानंतरही न्याय न मिळाल्याने आम्ही पुन्हा आंदोलन करत आहोत, असे जंतरमंतरवर उपस्थित कुस्तीपटूंनी सांगितले. यावषी जानेवारीमध्ये कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतरमंतरवर निदर्शने करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा मंत्रालयाने आरोपांच्या चौकशीसाठी दोन समित्या स्थापन केल्या होत्या.
आम्ही न्याय मागत असून अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. आम्ही एफआयआर दाखल करण्यासाठी आग्रह करत आहोत. मात्र, पोलीस ऐकत नसल्याची कैफियत रविवारी आंदोलनकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. आम्ही दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु अजूनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितले. तक्रारदारांमध्ये एका अल्पवयीनासह सात कुस्तीपटूंचा समावेश आहे. अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही पुन्हा धरणे धरण्याचा निर्णय घेतला असल्याचेही तिने स्पष्ट केले.
समित्यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. तपास अहवाल सार्वजनिक व्हायला हवा, मात्र त्याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. मुलींशी संबंधित प्रकरण किती संवेदनशील असते हे तुम्ही सगळेच समजू शकता, असेही साक्षी मलिक म्हणाली.
बृजभूषण सिंग यांना अटक झाल्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ. आमचा संयम सुटला आहे. चौकशीसाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, असे बजरंग पुनिया याने स्पष्ट केले. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी पुरावे दिले नसल्याचे वारंवार बोलले जात आहे. मात्र, बृजभूषण यांच्याकडून त्यांच्या निर्दोषतेचा पुरावा एकदा तरी घ्या, असे कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असेही स्पष्ट केले. या प्रकरणात आमची चूक सिद्ध झाली तर आम्ही शिक्षाही स्वीकारू. मात्र, आता जंतरमंतरवरून मागे हटणार नाही, असेही फोगट यांनी जाहीर केले.