वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू झालेल्या टाटा पुरस्कृत पाचव्या खुल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीत भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांनी आपले पहिले सामने जिंकत पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे.
पात्र फेरीच्या पहिल्या सामन्यात युकी भांब्रीने दियागो हिडाल्गोचा 6-2, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. दुसऱया एका सामन्यात चेन्नईच्या रामकुमार रामनाथनने ओटो व्हिर्टानेनवर 2-6, 7-5, 6-2 अशी मात केली. दक्षिण आशियातील ही एकमेव एटीपी 250 दर्जाची स्पर्धा असून महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात पाचव्या वर्षी घेतली जात आहे.
यावेळी या स्पर्धेत पात्र फेरीच्या विभागात भारताच्या तीन स्पर्धकांचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरन, सिद्धार्थ रावत आणि आदित्य बालसेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मार्टेररने गुणेश्वरनचा 7-6 (8-6), 3-6, 7-5 तसेच झिडानेक कोलारने सिद्धार्थ रावतचा 6-1, 6-7 (4-7), 6-1 तसेच कोबोलीने आदित्य बालसेकरचा 6-3, 6-0 असा पराभव केला. भारताच्या नवोदित टेनिसपटू 15 वर्षीय मानस धामणेला या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉसाठी वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. सदर स्पर्ध्योच्या प्रमुख ड्रॉमधील सामन्यानां सोमवार दि. 2 जानेवारीपासून प्रारंभ होणार असून ही स्पर्धा 7 जानेवारीला संपणार आहे.