बुडा कार्यालयात घेतली आढावा बैठक
प्रतिनिधी/ बेळगाव
बुडाकडून विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. बुडाचे भूखंड लिलावाद्वारे विक्री करण्यात येत आहेत. भूखंडांचे मोजमाप करून वितरित करण्यात यावेत, तसेच नवीन योजना राबविण्यासाठी शेतकऱयांना विश्वासात घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी बुडा अधिकाऱयांना केली. उपस्थित अधिकाऱयांना विविध सूचना करून अनधिकृत लेआऊटवर कारवाई करण्याची सूचना केली.
मंगळवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुडा कार्यालयाला भेट देऊन बुडाच्या कामाचा आढावा घेतला. बुडाच्यावतीने विकासकामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. सदर काम अमृत योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. बुडाच्यावतीने राबविण्यात येणाऱया विकासकामाची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी बुडा कार्यालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर विविध ठिकाणी भेटी देऊन ते कामकाजाचा आढावा घेत आहेत. मागील महिन्यात महापालिका कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली होती. त्याचप्रमाणे मंगळवारी बुडा कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांचे स्वागत बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी आणि बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी केले. त्यानंतर बुडाच्यावतीने राबविण्यात येणाऱया विविध योजनांची माहिती जाणून घेतली. बुडाच्या कार्यक्षेत्रात येणाऱया गावांची माहिती घेतली. बुडाच्यावतीने राबविण्यात आलेल्या वसाहत योजनांची माहिती देऊन कणबर्गी येथे नवीन वसाहत योजना राबविण्यासाठी भू-संपादन प्रक्रिया राबविण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी जिल्हाधिकाऱयांना दिली. नवीन योजना राबविताना भू-संपादनापूर्वी योजनेची माहिती शेतकऱयांना देऊन त्यांना विश्वासात घेऊनच भू-संपादन करावे, अशी सूचना बुडा अधिकाऱयांना केली. त्याचप्रमाणे बुडाच्यावतीने रामतीर्थनगर परिसरात राबविण्यात येणाऱया विकासकामांची माहिती दिली. रामतीर्थनगर आणि कुमारस्वामी लेआऊट वसाहत योजना महापालिकेकडे हस्तांतर करण्याच्या मुद्दय़ावरही चर्चा करण्यात आली. लेआऊटला मंजुरी देणे व नवीन योजना राबविण्यासाठी आवश्यक कारवाई करावी. अनधिकृत लेआऊटवर कारवाई करावी, अशा विविध सूचना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केल्या. महसूल विभागातील अधिकाऱयांना सूचना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बुडाचे नगर योजना अधिकारी ए. एस. कांबळे, प्रभारी कार्यकारी अभियंते एम. व्ही. हिरेमठ तसेच बुडाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.