बेन्नाळीजवळील घटनेत वृद्धाचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गुड्स बोलेरोच्या ब्रेझा कारला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातानंतर बोलेरो सर्व्हिस रोडवर उलटली. या अपघातात मध्यप्रदेशमधील वृद्धाचा मृत्यू झाला. तर मुलगाही जखमी झाला आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे.
मेंबर मंगीलाल बंजारा (वय 60) रा. मालखेडा, ता. मनासा, जि. निमच, मध्यप्रदेश असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. गंभीर अवस्थेत त्याला इस्पितळात दाखल केले होते. मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला. या अपघातात अनिल रोडीलाल (वय 15) हा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मेंबर व त्याचे काही सहकारी गावोगावी फिरून खुर्च्या विकतात. हावेरी जिल्हय़ात ते खुर्च्या विकण्यासाठी गेले होते. त्यानंतर गुड्स बोलेरोतून ते मध्यप्रदेशला जात होते. पप्पूलाल गोरीलाल सुरावत, रा. मालखेडा हा बोलेरो चालवत होता. बेन्नाळीजवळ बेझा कारला बोलेरोची पाठीमागून धडक बसली.
अपघातानंतर बोलेरो महामार्गावरून थेट सर्व्हिस रोडवर कलंडला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व सहकाऱयांनी पंचनामा केला. यासंबंधी महादेवनगर कोल्हापूर येथील बाबू निर्मळे यांनी काकती पोलिसात फिर्याद दिली.