जीवे मारण्याची धमकी तरीही नाकारली सुरक्षा, महामारी काळात पोलीस चांगल्या कामात गुंतावेत
रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थ सध्या चर्चेत आहे. सिद्धार्थ नारायणने सोशल मीडियाद्वारे तामिळनाडू भाजपवर स्वतःचा वैयक्तिक संपर्क क्रमांक उघड केल्याचा आरोप केला होता. संपर्क क्रमांक जाहीर झाल्यावर मला तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे अभिनेत्याचे म्हणणे आहे. तसेच कुटुंबातील महिलांनाही बलात्काराचे कॉल, संदेश मिळत आहेत. ही माहिती समोर आल्यावर अभिनेत्यला पोलिसांकडून सुरक्षा पुरविण्यात आली होती. पण अभिनेत्याने विनम्रतेने पोलीस सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे.
तामिळनाडू पोलिसांचे आभार
सिद्धार्थने अलिकडेच सोशल मीडियाद्वारे तामिळनाडू पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलीस सुरक्षा मिळालेला मी कुटुंबातील पहिलाच सदस्य आहे. पण मी नम्रपणे हा विशेषाधिकार सोडत आहे, महामारीच्या काळात पोलिसांना स्वतःचा वेळ अधिक चांगल्या कामात वापरावा असे सिद्धार्थने म्हटले आहे.
500 हून अधिक धमकीचे कॉल्स
सिद्धार्थने तामिळनाडू भाजप तसेच आयटी सेलवर संपर्क क्रमांक उघड केल्याचा आरोप केला होता. यानंतर मला तसेच माझ्या कुटुंबासाठी 500 हून अधिक शिविगाळ करणारे, बलात्कार तसेच जीवे मारण्याची धमकी देणारे कॉल्स आले आहेत. सर्व क्रमांक नोंद झाले असून ते पोलिसांना पुरविण्यात आले आहेत. धमक्या मिळाल्या तरीही मी गप्प बसणार नसल्याचे सिद्धार्थने नमूद पेले आहे.
चेन्नईत राहणार सिद्धार्थ नारायण सातत्याने भाजप सरकारवर लिहित आहे. काही लोक सोशल मीडियावर त्याला समर्थन देत आहेत. तर काही जण त्याच्यावर टीका करत आहेत. तर धमक्यांचे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.