अन् अनुष्का थेट गावसकरांवर संतापली!
महान फलंदाज, ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर हे शुक्रवारी विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्कावर टिपणी केल्यानंतर प्रचंड मोठय़ा वादाच्या भोवऱयात सापडले. विराट कोहली फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ असतो. शिवाय, त्याचे क्षेत्ररक्षणातील योगदानही निपूण असते. पण, किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध लढतीत क्षेत्ररक्षण करताना दोन झेल सोडल्यानंतर विराट फलंदाजीतही पुरता निष्प्रभ ठरला आणि त्यावरुन केलेल्या टिपणीचा चुकीचा अर्थ घेतला गेल्याने बराच अनर्थ झाला. पंजाबविरुद्ध लढत सुरु असताना गावसकरांनी विराटचा उल्लेख करताना अनुष्काचे नाव घेतले आणि यावर अनुष्काचा सर्वात मोठा आक्षेप राहिला. ‘लॉकडाऊन सुरु असताना विराट कोहलीने केवळ अनुष्काच्या गोलंदाजीचा सामना केला आहे’, असे सनी म्हणाले होते. लॉकडाऊनदरम्यान विराट कोहलीला अनुष्का गोलंदाजी करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्या संदर्भात सनी बोलत होते. पण, सोशल मीडियावर मात्र या वक्तव्याचा भलताच अर्थ घेतला गेला आणि याची कुणकूण लागताच अनुष्का सनी यांच्यावर प्रचंड संतापली.
अनुष्काने तातडीने इन्स्टाग्रामवर भली मोठी पोस्ट करताना त्यात सनींची टिपणी बेचव असल्याचे स्पष्टपणे नमूद केले. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते, ‘मि. गावसकर, आपली टिपणी अतिशय बेचव आहे, असे मला खेदाने नमूद करावेसे वाटते. पण, याचवेळी मी आपल्याला हे विचारु इच्छिते की, इतकी वर्षे आपण क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्यात लक्ष दिले नाही, तोच न्याय मला व आम्हाला का दिला नाही? विराटचा जो खेळ झाला, त्यावर टिपणी करणे यात काहीच गैर नव्हते. पण, त्यात माझे नाव घेण्याची काय गरज होती? आता 2020 चे वर्ष सुरु आहे. मात्र, माझ्यासाठी कदाचित काहीच बदललेले नाही. मला क्रिकेटमध्ये निष्कारण ओढणे केव्हा बंद होईल? खरं तर तुम्ही या सभ्य खेळातील महान व्यक्तिमत्व आहात. पण, तरीही तुमची टिपणी ऐकल्यानंतर मला जे वाटले, ते मी इथे मांडले आहे’. मागील अनेक वर्षात ज्या-ज्यावेळी विराट कोहली मैदानावर अपयशी ठरला, त्या-त्या प्रत्येक वेळी त्याचे खापर अनुष्कावर फोडले गेले. त्याचाही अनुष्काने येथे उल्लेख केला. ती म्हणाली, ‘विराट व मी फक्त मित्र होतो, तेव्हापासून मी बरेच सोसले आहे. अगदी आमच्या विवाहानंतर देखील यात काहीच बदल झाला नाही. माझ्यासाठी ही वेदना देणारी बाब आहे. मी अशा प्रत्येक वेळी शांत राहिले’. विराट कोहली व अनुष्का शर्मा ही सिलेब्रिटी जोडी सध्या आपल्या पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या चाहत्यांना ही सुवार्ता दिली.