भाजप कार्यकर्त्यांची मागणी : रक्ताने लिहिले पत्र : पंतप्रधान मोदींचा 14 रोजी दौरा
वृत्तसंस्था/अलिगढ
उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मोहम्मद अली जिना यांच्या फोटोबाबत पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. अलिगढच्या भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहले आहे. या पत्रात विद्यापीठातून जिना यांचा फोटो हटवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पत्र कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनालाही सुपूर्द केले आहे. दरम्यान, पंतप्रधान 14 रोजी अलिगढ येथे येणार असून त्याआधी हा वाद सुरु झाल्याने पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या युनियन हॉलध्ये मोहम्मद अली जिना यांचा फोटो लावण्यात आला आहे. यामुळे अनेकदा वाद झाला आहे. आता 14 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अलिगढला जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा हा वाद पेटला आहे.
देशाच्या विद्यापीठात जिना यांचे काय काम ?
देशाची विभागणी करणाऱया मोहम्मद अली जिना यांच्या फोटोचे विद्यापीठात काय काम ? जीना यांनी भारताची विभागणी करुन पाकिस्तान बनवला. धर्माच्या नावावर देश तोडला, त्यामुळे जिना यांचा फोटो विद्यापीठात असू नये, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.