नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 58 हजार 97 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांचा आकडा 3 कोटी 50 लाख 18 हजार 358 वर पोहोचला आहे. अशातच मंगळवारी दिवसभरात 534 रुग्णांचा मृत्यू झाल्याने या महामारीत जीव गमावणाऱयांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 551 वर पोहोचली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे 2 हजार 135 रुग्ण समोर आले आहेत.
देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 2 लाख 14 हजार 4 वर पोहोचली आहे. मंगळवारी दिवसभरात 15 हजार 389 रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तथापि, नव्या बाधितांमध्ये गेल्या आठवडाभरात झपाटय़ाने वाढ होत असल्याने सक्रिय आणि बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
आतापर्यंत 147 कोटींहून अधिक डोस
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या लसीचे 147 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी 96 लाख 43 हजार 238 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत लसीचे 147 कोटी 72 लाख 8 हजार 846 डोस देण्यात आले आहेत. सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाल्यापासून लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला आहे.
मुलांच्या लसीकरणात झपाटय़ाने वाढ
देशात 18 ते 17 वर्षे वयोगटातील 1 कोटींहून अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यापैकी सोमवारी पहिल्या दिवशी सुमारे 42 लाख मुलांना लस देण्यात आली. बालकांच्या लसीकरणाचा बुधवारी तिसरा दिवस होता. बरीचशी मुले को-विन ऍपवर पूर्वनोंदणी करून आपला डोस निश्चित करत आहेत. तसेच आता वैद्यकीय पथके शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण करत आहेत.