पोलिसांनी मृताच्या आईला घेतले ताब्यात, दारु पाजून डोक्यात दगड टाकून केला खून, सातारा शहर पोलिसांकडून तपास सुरु
प्रतिनिधी / सातारा
मुलगा सतत त्रास देत असल्याने आईनेच भावाच्या मुलाला मुलाचा बंदोबस्त करण्यास सांगितले होते. त्यानुसार आत्याने सांगताच भाच्याने आतेभावाला अगोदर दारु पाजून आठ दिवसांपूर्वी विलासपुर गावच्या परिसरात महामार्गाच्या सेवारस्त्याच्या कडेला मित्राच्या सहाय्याने डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मृत झालेला प्रकाश सुदाम कदम(वय 30 रा. वळसे)याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी विलासपुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. मार्ली घाटात घडलेल्या सिरीयल किलींगच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुचना देताच शहर, तालुका आणि शाहुपूरीचे डिटेक्शन ब्रॅन्च तेथे पोहचल्या. आढळून आलेला मृतदेह सडून गेलेला होता. कोणत्याही खुणा ओळखीच्या नव्हत्या. मृतदेह कोणाचा आहे हे ओळखणे कठीण होते. विभागीय पोलीस अधिकारी समिर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार डिटेक्शन ब्रॅन्च कामाला लागली. खबऱयांकडून लगेच अर्धातासात लिंक लागली. एकाने पाच दिवसांपूर्वी मृतदेह पाहिला होता. त्यास पोलिसांनी गाठले अन् त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु खोलात जावून विचारणा केली असता त्याने माहिती दिली. त्यावरुन दोघांनी खून केल्याचे समजले.
पोलिसांनी त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या दोघांना सातारा एमआयडीसी परिसरातून प्रमोद बापू साळुंखे, साहिल मुन्ना मुलांणी दोघेही देगावला राहणारे. या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनीही खरी माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खोदून विचारताच त्यांनी केलेल्या कृत्याची कबुली दिली. प्रमोद साळुंखे याची आत्या वळसे येथे असून त्याचा मुलगा प्रकाश हा आईला सतत त्रास द्यायचा. त्याला जरा समजव, अशी आत्या वारंवार प्रमोदला करायची. प्रमोदला दारुचे व्यसन होते. तो काहीही काम करत नव्हता. आत्यासाठी तो काहीही करायचा. आत्याने सांगताच आठ दिवसांपूर्वी त्याने आत्याचा मुलगा प्रकाश व त्याचा मित्र साहिल असे तिघे साताऱयात शिवराज पेट्रोल पंप परिसरात दारु प्यायले. अन् तेथून तिघेही चालत निघाले. तेव्हा प्रमोदच्या डोक्यात प्रकाशचा काटा काढायचा हे होतच. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर सर्व्हीस रस्त्यावरुन झाडीत आणखी दारु पिण्याच्या बहाण्याने आत ते तिघे गेले. तिथेच भांडण उकरुन काढून प्रमोदने प्रकाशला खाली पाडले आणि त्याचा मित्र साहिलने प्रकाशचे पाय धरले. अगोदर प्रकाशचा प्रमोदने गळा आवळला. त्यांनतर त्याची शुद्ध हरपल्यावर बाजूचा दगड त्याने डोक्यात घालून खून केला. तेथून दोघेही निघून गेले. पोलिसांनी मृताच्या आईलाही रात्री ताब्यात घेतले असून आज या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.सातारा शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.