बेळगाव – एखाद्या सहकारी संस्थेला स्वतःच्या इमारती असणे हे स्थिरतेचे व भक्कमतेचे प्रतीक असते, हे लक्षात घेऊन अनगोळ रोड स्थित आदर्श मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सर्व शाखा स्वतःच्या वास्तूत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून खानापूर येथील शाखा स्वतःच्या जागेत स्थलांतरित करीत आहोत, अशी माहिती अनगोळ रोड स्थित आदर्श मल्टीपर्पज सहकारी सोसायटीचे चेअरमन दिगंबर राऊळ यांनी बोलताना दिली.
आदर्श सोसायटीच्या खानापूर येथील शाखेचे स्वतःच्या प्रशस्त जागेत सोमवारी दुपारी समारंभपूर्वक स्थलांतर करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
खानापूर शाखेचे स्थलांतर बेळगाव-गोवा रोडवरील टीपीसी नंबर 1519 येथे (स्टेट बँकेसमोर) समारंभपूर्वक सोमवारी करण्यात आले. यानिमित्ताने वास्तुशांती व सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. सुचिता व दिगंबर राऊळ यांनी पूजा केल्यानंतर उपस्थित असलेल्या भागधारकांचे व ग्राहकांचे संचालकांच्यावतीने स्वागत करण्यात आले. दिगंबर राऊळ यांच्या हस्ते फीत सोडून शाखेच्या कार्यालयाचा प्रारंभ करण्यात आला. संचालक नेमिनाथ कंग्राळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
आदर्श सोसायटीच्या अनगोळ रोड बेळगाव, कचेरी रोड, उद्यमबाग, शिवाजी रोड, हिंडलगा, वडगाव व खानापूर आदी ठिकाणी शाखा आहेत.
सध्या सोसायटीकडे 84 लाखाचे भागभांडवल असून 7 कोटी 70 लाखाचा राखीव इतर निधी आहे. 65 कोटी 25 लाखाच्या ठेवी, 51 कोटी 10 लाखाची कर्जे आणि 20 कोटी 75 लाखाची गुंतवणूक सोसायटीने केली आहे. खेळते भांडवल 75 कोटी 30 लाख रुपये आहे.
या संस्थेच्या संचालक मंडळात व्हाईस चेअरमन एन. आर. सनदी, एस. एम. जाधव, ए. एल. गुरव, ॲड. एम. व्ही. परब, आय. वाय. मेलगे, आर. टी. पवार, ए. ए. साळवी, रजनी एम. पाटील, एल. एम. शानभाग, ए. सी. रोकडे, पी. एस. साळुंखे यांचा समावेश असून पी. बी. माळवी हे सेपेटरी म्हणून काम पाहत आहेत. याप्रसंगी सर्व संचालक, कर्मचारी वर्ग आणि खानापूर परिसरातील ग्राहक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.