प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात सध्या थैमान माजविले आहे. यामुळे अमेरिका, इटली सारख्या रुग्ण सेवेकरिता पुढारलेल्या देशात देखील व्हेंटिलेटर, औषधे यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आपल्या देशाला या परिस्थितीशी सामना करावा लागू नये या हेतूने काही तरुणांनी मिळून अल्पदरात व्हेंटिलेटर विकसित केले आहे. हे व्हेंटिलेटर बनविण्या करिता साताराच्या युवकाचा देखील सहभाग आहे.
येथील शाहूनगर परिसरातील रहिवासी सलमान शेख याचा देखील हे व्हेंटिलेटर बनविण्यात सहभाग आहे. सलमान पुण्यातील विविध रुग्णालयात रीहायबिलेटेशन युनिटचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सातारा इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो पुण्याला रवाना झाला बायोमेडिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काही काळ सेवा बजावली आहे. सलमान व त्याचे सहकारी अमित केंजळे आणि मधुरा शिंदे यांच्या सहकार्याने हे व्हेंटिलेटर विकसित केले आहे. प्रारंभी तीन व्हेंटिलेटर बनविले होते. त्यापैकी पहिले व्हेंटिलेटर बनविण्यासाठी दहा हजार इतका खर्च आला होता व तिसरे परीक्षणासाठी पाठविण्यात आलेले व्हेंटिलेटर बनविण्यासाठी एकूण 17 हजार इतका खर्च आला आहे. पुणे येथील खडकी मिलिटरी हॉस्पिटल मध्ये हे व्हेंटिलेटर परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. प्रारंभी हे व्हेंटिलेटर मेरठ येथे परीक्षणासाठी पाठवण्यात येणार होते. पण लॉक डाऊन’मुळे हे व्हेंटिलेटर खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार काही फेरबदल करून येत्या दोन दिवसात हे वेंटिलेटर रुग्णांच्या सेवेत करिता दाखल होणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरूपात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणे हे गरजेचे असते त्यामुळे ओपन सोर्स म्हणून हा प्रकल्प वापरता वापरता येणार आहे. यासाठी टेक्निकल डिझाईन प्रमुख म्हणून सलमान शेख आणि अमित केले यांनी काम पाहिले आहे. यामध्ये पॉझिटिव्ह प्रेशर सध्याच्या विकासासह वेगवान प्रकल्प म्हणून काम करत असल्याने तो निक्रिय श्वासोश्वास घेण्यासाठी उपयुक्त ठरतो या जलदगती प्रकल्पाचे उद्दिष्ट येत्या आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असणार आहे.
लाईफ सपोर्ट च्या मागणीला सामोरे जाण्यासाठी एक उपाय म्हणून तयार करण्यात आलेले हे डिझाईन कोरोना सारख्या संकटाशी दोन हात करण्यासाठी वरदान ठरणार आहे.
सलमान शेख
सर्वसामान्यांपर्यंत सेवा पोहोचविण्यात यावी या उद्देशाने हे व्हेंटिलेटर विकसित करण्यात आले आहे. यापूर्वीदेखील मी कृत्रिम पाय बनविले होते. सध्याची स्थिती पाहता आम्ही हे व्हेंटिलेटर बनविण्याचे ठरविले. सध्या एक व्हेंटिलेटर बनविण्यासाठी 17 हजार इतका खर्च आला असून याचे मानांकन मिळाल्यास मागणीनुसार अधिक प्रमाणात व्हेंटीलेटर बनविण्याचा मानस आहे. जेणेकरून सामान्यांपर्यंत याची सेवा पोहोचता येईल.