वृत्तसंस्था/ सिडनी
कोरोना महामारी समस्येमुळे भारतात खेळविली गेलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा अर्धवट स्थितीत तहकूब करावी लागली. आता या स्पर्धेतील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्याची योजना आखण्यात आली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स या स्पर्धेत आपले पुनरागमन करणार नसल्याचे सांगण्यात आले. पॅट कमिन्स या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता.
आयपीएल क्रिकेट स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यास भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने अधिकृत मान्यता दिली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले ऑस्ट्रेलियाचे अन्य खेळाडू ऑस्ट्रेलियातील लीग स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दरम्यान आयपीएल स्पर्धेसाठी बायोबबलमध्ये दाखल होताना आपल्यावर अधिक मानसिक दडपण येत असल्यामुळे या स्पर्धेत पुनरागमन करणार नसल्याचे कमिन्सने सांगितले. सदर बातमी ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.
तहकूब करण्यात आलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तसेच विंडीजचे अनेक क्रिकेटपटू सहभागी झाले होते. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा विंडीज दौरा जूनअखेरीस सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड संघाचा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम असल्याने या दोन्ही देशांचे क्रिकेटपटू संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या उर्वरित सामन्यात सहभागी होण्याची शक्यता दुरावली आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये गेल्यावर्षी आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे भरविली गेली होती. आता पुन्हा याच ठिकाणी 2021 च्या आयपीएल स्पर्धेतील उर्वरित 31 सामने खेळविले जाणार आहेत.