वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती या क्रीडाप्रकारात भारताचे एकमेव आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच अशोककुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विश्व संयुक्त कुस्ती फेडरेशनच्या नियंत्रण समितीने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती पंच अशोककुमार यांची शिफारस केली होती. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कुस्ती या क्रीडाप्रकारात भारताचे अशोककुमार हे एकमेव पंचगिरी करणार आहेत. ऑलिंपिक स्पर्धेसाठी पंचांची नियुक्ती करण्याकरिता निवड चाचणी प्रक्रिया घेण्यात आली आणि त्यामध्ये अशोककुमार यांची निवड झाली. 2019 च्या कझाकस्तानमध्ये झालेल्या वरिष्ठांच्या विश्व कुस्ती स्पर्धेपासून या निवड चाचणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आणि गेल्या महिन्यात बल्गेरियातील विश्व ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धा शेवटची ठरली. भारतीय हवाई दलात 50 वर्षीय अशोककुमार सेवा बजावत आहेत. 2016 साली झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेवेळीही अशोककुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2005 पासून अशोककुमार यांना आंतरराष्ट्रीय पंचगिरीचा अधिकृत परवाना मिळाला होता. त्यानंतर सुमारे 100 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कुस्ती पंच म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. 2018 साली झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच 2018 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत अशोककुमार यांनी पंचगिरी केली आहे. भारतीय हवाईदल कुस्ती संघाचे ते प्रशिक्षक आहेत.