20 हजार जणांना संधी – डूम, परसिस्टंटचाही समावेश
मुंबई
डिजिटल पेमेंट क्षेत्रातील कंपनी पेटीएम आपला आयपीओ आणण्यापूर्वी 20 हजार जणांची भरती करणार असल्याचे समजते. यासोबतच दुसरीकडे युनिकॉर्न स्टार्टअप कंपनी डूम व आयटी क्षेत्रातील कंपनी परसिस्टंटकडूनही नजिकच्या काळात उमेदवारांची भरती करून घेतली जाणार आहे.
डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम आपला आयपीओ आणणार असून त्यायोगे 16 हजार 600 कोटी रुपये उभारणार आहे. पण आयपीओ आणण्यापूर्वी कंपनी फिल्ड सेल्स एक्झिक्मयुटिव्ह पदांतर्गत 20 हजार जणांची भरती करणार आहे. सदरचे प्रतिनिधी दुकानदार व ग्राहकांमध्ये डिजिटल पेमेंटसंदर्भात जागृती करणार आहेत. क्मयुआर कोड, युपीआय, पेटीएम पोस्टपेड, मर्चंट लोन या कंपनीच्या सेवांबाबतची माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत नव्या उमेदवारांकडून पोहचविली जाणार आहे. सदरच्या उमेदवारांना प्रतिमहिन्याला वेतन व कमिशन मिळून 35 हजार रुपये देण्याची योजना कंपनीची आहे. पेटीएम ऍपवरून उमेदवारांना अर्ज करता येणार असून 18 वर्षे पूर्ण केलेल्या दहावी, बारावी व पदवीधरांना अर्ज करता येणार आहे. अर्जदाराकडे स्मार्टफोन जरुरीचा असणार असून पेटीएम ऍपमार्फत अर्ज करायचा आहे.
डूम करणार 1 हजार जणांची भरती
ऑनलाईन ऑटोमोबाईल मार्केट प्लेस स्टार्टअप डूमने आगामी काळात भारतात 1 हजार जणांची भरती करण्याचे ठरविले आहे. स्टार्टअप कंपनी डूम आपला आयपीओ आणणार असून याअंतर्गत 20 कोटी डॉलर्सचा निधी उभारणार आहे. युनिकॉर्न कंपनी येणाऱया काळात देशातील 100 शहरात व्यवसाय विस्तारणार असून याअंतर्गत 1 हजार जणांची भरती करणार आहे.
परसिस्टंट करणार 2 हजार जणांची भरती
पुण्यातील आयटी क्षेत्रातील कंपनी परसिस्टंट सिस्टम्स 2021-22 आर्थिक वर्षात 2 हजार नव्या उमेदवारांना रोजगाराची संधी मिळवून देणार आहे. सदरच्या नव्या उमेदवारांना 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गेल्या 3 तिमाहीत 4 हजार 200 जणांना भरती करण्यात आले आहे.