अमृतसर विमानतळावर कोरोनाचा स्फोट : सर्व प्रवासी क्वारंटाईन
अमृतसर / वृत्तसंस्था
पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी इटलीहून आलेल्या एअर इंडियाच्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये 125 प्रवाशांना संसर्ग झाल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली. या प्रवासात विमानात एकूण 179 प्रवासी होते. सर्व बाधितांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. एकाच विमानामध्ये एवढय़ा मोठय़ा संख्येने कोरोनाबाधित सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
केंद्र सरकारने इटलीला धोका असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्यामुळे तिथून विमान सकाळी 11.30 वाजता अमृतसर विमानतळावर उतरल्यानंतर प्रत्येक प्रवाशाची चाचणी करण्यात आली. फ्लाईटमध्ये असलेल्या 179 जणांपैकी 160 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीत 125 प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रवाशांमध्ये 19 अल्पवयीन मुले असल्याने त्यांची चाचणी करण्यात आलेली नाही. सध्या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे अमृतसर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक व्ही. के. सेठ यांनी सांगितले.
सर्व नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले
पॉझिटिव्ह आढळून आलेल्या सर्व प्रवाशांचे अहवाल आरोग्य विभागाकडे सोपविण्यात आले असून आरोग्य विभागाने विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने सर्व प्रवाशांना विलगीकरण केंद्रात पाठवले आहे. तसेच आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने प्रत्येकाच्या स्वॅब चाचण्या घेतल्या असून त्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत. याचा अहवाल एक-दोन दिवसात आल्यानंतर संबंधित पॉझिटिव्ह रुग्णांच्या व्हेरियंटबाबतची स्पष्टोक्ती होणार आहे.