वृत्तसंस्था/ रावळपिंडी
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात दिवसअखेर 90 षटकात 1 बाद 245 धावा जमविल्या. सलामीचा फलंदाज इमाम उल हकने नाबाद शतक (132) तर अझहर अलीने नाबाद अर्धशतक (64) झळकविले.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अब्दुल शफीक आणि इमाम उल हक या सलामीच्या जोडीने पाकच्या डावाला प्रारंभ केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर पाकच्या या सलामीच्या जोडीने आपल्या संघाचा धावफलक सातत्याने हलता ठेवताना एकेरी आणि दुहेरी धावांवर अधिक भर दिला. या जोडीने 33.5 षटकात 105 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या लेयॉनने अब्दुल शफीकला कमिन्सकरवी झेलबाद केले. त्याने 105 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा जमविल्या.
इमाम उल हक आणि अझहर अली या जोडीने पहिल्या दिवशीच्या उर्वरित खेळामध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीसमोर पाकच्या या जोडीने भक्कम फलंदाजी केली. या जोडीने दिवसअखेर दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 140 धावांची भागीदारी केली आहे. इमाम उल हकने शानदार शतक झळकविले. तो दिवसअखेर 271 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारांसह 132 धावांवर खेळत आहे. इमाम उल हकला अझहर अलीकडून चांगली साथ मिळाली आहे.
अझहर अली 165 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 64 धावांवर खेळत आहे. या कसोटीत उपाहारापूर्वी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पाकची सलामीची जोडी फोडण्यात यश मिळाले. पण त्यानंतर खेळाच्या दोन सत्रांमध्ये ते म्हणावे तसे यशस्वी ठरले नाहीत. ऑस्ट्रेलियन संघाचा बऱयाच वर्षांनंतर हा पाकचा पहिला दौरा असल्याने या कसोटीला क्रिकेटशौकिनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कसोटीची सर्व तिकिटे यापूर्वीच विकली गेली आहेत.
दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या बऱयाच वर्षांपासून विदेशी संघ पाकचा दौरा करणे टाळत आले आहेत. पण गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत विदेशी संघांनी पाकमध्ये खेळण्याची तयारी दर्शविली असल्याने पीसीबीची आर्थिक स्थिती आता यापुढे सुधारेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यंतरी आयसीसीच्या विविध देशांच्या दौरा कार्यक्रमानुसार पाक संघाला आपले सामने त्रयस्थ ठिकाणी खेळावे लागत होते.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव- 90 षटकात 1 बाद 245 (अब्दुल शफीक 44, इमाम उल हक खेळत आहे 132, अझहर अली खेळत आहे 64, अवांतर 5, लेयॉन 1-87).