रोड सेफ्टी सिरीजमधील चौथा खेळाडू बाधित, सचिन-युसूफ-बद्रिनाथला यापूर्वीच लागण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण हा अलीकडेच संपन्न झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये सहभागी झालेल्या संघातील चौथा कोरोनाबाधित खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, सुब्रमण्यम बद्रिनाथ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अलीकडेच रायपूरमध्ये ही मास्टर्स स्पर्धा संपन्न झाली होती.
इरफानने आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे सोमवारी ट्वीटरवरुन घोषित केले. ‘कोणतीही लक्षणे नसताना मला कोरोनाची लागण झाली आहे आणि मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे. अलीकडील कालावधीत माझ्याशी जे संपर्कात आले, त्यांनी आपली चाचणी करवून घ्यावी, अशी माझी विनंती आहे’, असे ट्वीट इरफानने केले.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ही खासगी स्वरुपाची स्पर्धा होती आणि फक्त निवृत्त खेळाडूच त्यात खेळणार असल्याने स्पर्धेला बीसीसीआयच्या परवानगीची गरज नव्हती. अर्थात, चाहत्यांची तुफान गर्दी झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला आणि आयोजकांनी त्यावर नियंत्रणासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, असे निदर्शनास आले. अगदी इंग्लंडचा संघ भारत दौऱयावर असताना बीसीसीआयने मालिकेच्या उत्तरार्धातील बरेच सामने बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवले होते. रोड सेफ्टी स्पर्धेत विंडीजचा ब्रायन लारा, इंग्लंडचा केविन पीटरसन, लंकेचे सनथ जयसूर्या, चमिंडा वास तसेच भारताचे सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, मुनाफ पटेल असे अनेक दिग्गज माजी खेळाडू सहभागी झाले होते.