कामगार वगळता नागरिकांनी बाहेर पडणे टाळले
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे उद्यमबाग परिसरात सोमवारी तुरळक गर्दी पाहायला मिळाली. कारखान्यांमधील कामगार वगळता इतर नागरिकांनी बाहेर पडणे टाळले. काही मोजकीच किराणा मालाची दुकाने, मेडिकल वगळता इतर सर्व ठप्प असल्याचे दिसून आले.
नियम शिथिल झाल्यामुळे उद्यमबाग परिसरात गर्दी होईल, असा अंदाज होता. परंतु पहिल्याच दिवशी कामगारांनीही कामावर येणे टाळले. सकाळी 7 वाजल्यापासून काही कामगार कामावर जाताना दिसत होते. जागोजागी पोलीस चौकशी करून त्यांना पुढे सोडत होते. उद्यमबाग परिसरात कारखाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती.
कारखान्यांमधील साहित्य ने-आण करण्यासाठी लागणाऱया वाहनांसाठी काही दुरुस्तीची दुकाने सुरू करण्यात आली होती. त्याचबरोबर बेकरी, मेडिकल, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतर पाळत लॉकडाऊनचे पालन केले.