हमारा बजाज’ मुळे पोहोचले घराघरात
@ पुणे, पिंपरी / प्रतिनिधी
वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोचे माजी अध्यक्ष, ज्ये÷ उद्योगपती आणि बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल कमलनयन बजाज यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुले राजीव व संजीव, मुलगी सुनैना तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने उद्योगनगरीवर शोककळा पसरली आहे.
आजारपणामुळे राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालविली. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधी शाखेमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले. राहुल बजाज सन 1968 मध्ये बजाज ऑटोचे ‘सीईओ’ झाले. ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वांत तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते.
देशातील सर्वांत यशस्वी उद्योगपतींपैकी एक असलेल्या राहुल बजाज यांनी दुचाकी आणि तीन चाकी वाहन उत्पादन क्षेत्रात ‘बजाज’चे नाव आघाडीवर नेले. त्या काळात स्कूटर आणि रिक्षा म्हणजे बजाज हे समीकरणच निर्माण झाले. स्वतःला देशातील सर्वांत मोठय़ा कंपन्यांपैकी एक बनविण्यात त्यांनी यश मिळविले. सन 1965 मध्ये 2 कोटींवरून सुरू झालेली बजाजची उलाढाल सन 2022 मध्ये 12 हजार कोटींवर पोहोचली.
पद्मभूषणने सन्मान
बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोलाचा वाटा आहे. उद्यागक्षेत्रातील योगदानाबद्दल 2001 मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रोखठोक खासदार
2006 ते 2010 या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार होते. अत्यंत रोखठोक स्वभाव असलेल्या बजाज यांचे सर्व राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला होता.
50 वर्षे धुरा सांभाळली
पाच दशकांपासून अधिक काळ ’बजाज ऑटो’ची धुरा यशस्वीरीत्या सांभाळणाऱया राहुल बजाज यांनी एप्रिल 2021 मध्ये बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर 67 वषीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. 50 वर्षे ते आकुर्डी येथील बजाज कारखाना परिसरातच कुटुंबियांसह वास्तव्याला होते.
अनेकांना रोजगार दिला
अनेक परदेशी कंपन्यांच्या आव्हानाला सामोरे जात बजाज यांनी भारतात बजाज कंपनीला नावारुपास आणले. आज बजाज कंपनी फक्त भारतातच नाही, तर जगभरातील विविध देशांत पोहोचली आहे, याचे श्रेय राहुल बजाज यांना जाते. यातून एक स्वदेशी कंपनी होण्याबरोबरच बजाजने अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.