प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव पालिका इमारत सध्या गर्दीचे ठिकाण आणि कोरोना प्रसाराचे केंद्र बनलेले आहे. उत्पदनाचा दाखला किंवा रहिवासी दाखल्यासाठी सध्या या इमारतीत गर्दी उसळत असून रेल्वे दुपदरीकरण विरोधी आंदोलनानेही सोमवारी या इमारतीमध्ये गर्दीचा कहर केला. त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भिती व्यक्त होऊ लागलेली आहे.
गृह आधार योजना, दयानंद सामाजीक सुरक्षा योजना व इतर योजनांचा लाभ गेल्या काही महिन्यांपासून गरजवंतांना मिळालेला नाही. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या या लोकांना सरकारच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा लागलेली आहे. त्यातल्या त्यात गृह आधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. ही आर्थिक मदत पुन्हा खात्यात जमा करण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी या लाभार्थ्यांना उत्पनाचा दाखल, रहिवासी दाखला, हयात असल्याचा दाखला मिळवावा लागणार असून महिलांची या दाखल्यांसाठी सध्या धावपळ उडालेली आहे. मुरगावच्या मामलेदार कार्यालयाबाहेर महिलांची या दाखल्यांसाठी गर्दी पडत आहे. बऱयाच दिवसांपासून हा प्रकार सुरू असून कोरोनाचा संसर्ग पाठी लागलेला असतानाही अशा प्रकारे गर्दी उसळत असल्याने भिती व्यक्त करण्यात येत आहे. मामलेदार कार्यालयात व कार्यालयाबाहेर दाखल्यांसाठी उसळणाऱया गर्दीला सामाजीक अंतराचे भान असल्याचे दिसत नाही. या महिलांना कोरोनाच्या भितीपेक्षा सरकारकडून मिळणारी मासिक आर्थिक मदत दाखल्यांअभावी गमावली जाण्याची भिती वाटत आहे. त्यामुळे आरोग्याचा विचार न करता महिला मोठय़ा संख्येने पालिका इमारतीत गर्दी करीत आहेत. काहींची या कामासाठी दररोज ये जा होत असते. या गर्दीच्या गंभीर प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रेलमार्ग दुपदरीकरण विरोधी आंदोलनकर्त्यांचीही पालिका इमारतीत उसळली गर्दी
मुरगाव पालिका इमारतीत मामलेदार कार्यालयाप्रमाणेच उपजिल्हाधिकाऱयांचे कार्यालयही आहे. सोमवारी उपजिल्हाधिकाऱयांसमोर रेल्वे दुपदरीकरणासाठी ताब्यात घेण्यात येणाऱया जमीनीच्या प्रक्रियेसाठी संबंधीत जमीन मालकांची सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यामुळे जमीन संपादन करण्यासाठीच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी आलेले शेकडो लोक याच इमारतीतील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर तुटून पडले. पालिका इमारतीत चेंगराचेंगरी व्हावी ऐवढय़ा मोठय़ा प्रमाणात आंदोलकांची गर्दी पडली होती. यापैकी कोणालाच कोरोना संसर्गाचे भान नव्हते. सामाजीक अंतराच्या नियमांचा पूर्ण फज्जा उडाला होता. ही गर्दी तब्बल तीन तास होती. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी ठेवण्यात आलेले पोलीस या गर्दीपुढे हतबल झाले होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करून सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन विविध प्रकारे करण्यात येत असले तरी सामान्य लोकांबरोबरच नेते मंडळीही कोरोनाच्या भितीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्याबाबतीत पूर्ण काळजी घेणाऱया लोकांमध्येही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दाखल्यांसाठी कोरोनाची पर्वा न करता महिलांना वेठीस धरले जातेय – संकल्प आमोणकर
दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी सरकार दाखल्यांसाठी महिला वर्गाला वेठीस धरीत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या तिजोरीत सध्या पैसा नाही. तरीही सरकार महिलांना गाजर दाखवत असून निवडणुक जवळ आल्यानेच सरकार नवनवीन कल्पना लढवत असल्याचे व जनतेची फसवणुक करू पाहात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पालिका इमारतीतील मामलेदार कार्यालयात दाखल्यांसाठी दर दिवशी 300 ते 400 महिलांची उसळणारी गर्दी हा विषय कोरोना संसर्गाच्या दृष्टीने भितीदायक असून पैसा नाही तर सरकार या उठाठेवी कशाला करू लागले आहे असा प्रश्न आमोणकर यांनी केला आहे. पालिका निवडणुका आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजू लाभार्थी आमदारांजवळ यावेत. त्या लोकांच्या अर्जांवर सहय़ा करण्यासाठी त्यांच्याजवळ पाठींब्याची मागणी करावी. अन्यथा भिती दाखवावी अशासाठीच हा प्रयत्न असल्याचा संशय आमोणकर यांनी व्यकत केला आहे. दाखला मिळवायला हवा या भितीपोटी महिला कोरोनाची भिती विसरून या गर्दीत तासंतास काढीत असतात. हा प्रकार संतापजनक असल्याचे आमोणकर यांनी म्हटले आहे.