गुंतवणूकदारांना 8 ते 8.25 टक्केपर्यंत व्याज मिळणार : कंपनीची माहिती
मुंबई
भारतामधील दिग्गज टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये कंपनी आपले कॉर्पोरेट बॉण्ड सादर करणार आहे. सदरच्या सादरीकरणानंतर कंपनी जवळपास 5,000 कोटी रुपयांची उभारणी करण्याच्या तयारीत आहे. हा रुपी बॉण्ड राहणार असून ते 3 ते 10 वर्षासाठी सादर केले जाणार आहेत. जवळपास 8 ते 8.25 टक्के इतका व्याजदर देणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
बँक एफडीमध्ये साधारणपणे 5 ते 7 टक्के व्याजदर मिळते. मात्र एअरटेल त्यापेक्षाही अधिकचे व्याज बॉण्डवर देणार असून या माध्यमातून कंपनी अधिकची रक्कम जोडणार आहे.
कंपनीचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी 5 जी स्पेक्ट्रमसाठीचा लिलाव होण्याअगोदर कंपनीला आर्थिकदृष्टय़ा पाठबळ दिले आहे. प्रारंभी 7,500 कोटी रुपयांच्या उभारणीची घोषणा केली त्यात 5,000 कोटी रुपयांचे बॉण्ड बाजारात आणले जाणार आहेत.
कंपनीवर 1.60 लाख कोटींचे कर्ज
डिसेंबर महिन्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत एअरटेलचे कर्ज हे जवळपास 1.60 लाख कोटी रुपये होते, ज्यामध्ये सप्टेंबरच्या अंतिम टप्प्यापर्यंत हा आकडा 1.66 लाख कोटी रुपये राहिला होता.
गुगल 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार
मागील महिन्यात अमेरिकन कंपनी गुगलने दिलेल्या माहितीनुसार भारती एअरटेलमध्ये 1 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक
करणार आहे. कंपनीमध्ये 700 दशलक्ष डॉलर आणि 300 दशलक्ष डॉलर आगामी पाच वर्षात गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय आहे कॉर्पोरेट बॉण्ड?
कंपन्या बँक कर्जाचा पर्याय म्हणून या प्रकारासाठी कॉर्पेरेट बॉण्ड सादर करुन कर्ज उभारणी करत आहेत. कोणताही कॉर्पोरेट बॉण्ड किती सुरक्षित आहे, ज्याची पडताळणी रेटिंग एजन्सी आणि क्रेडिट रेटिंगच्या माध्यमातून करता येणार आहे. एएए रेटिंग असणाऱया कंपन्यांचे बॉण्ड सर्वात सुरक्षित मानले जात आहेत.