एलिना साल्ढाणा यांचे गुदिन्हो यांना आव्हान
प्रतिनिधी/ पणजी
कुठ्ठाळीचे आमदार म्हणून 20 वर्षांच्या कार्यकाळात केलेला एक तरी विकास प्रकल्प दाखवावा, असे खुले आव्हान आम आदमी पक्षाच्या नेत्या एलिना साल्ढाणा यांनी वाहतूक तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांना दिले आहे.
गुदिन्हो यांनी एलिना साल्ढाणा यांचा पराभव करण्यासाठी सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्लई यांना कुठ्ठाळीतून भाजपच्या उमेदवारीसाठी जाहीर समर्थन दिले आहे. झुआरीनगर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान गुदिन्हो यांनी कुठ्ठाळीतील लोकांना अनुभवी व्यक्तीची गरज आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना साल्ढाणा बोलत होत्या.
गुदिन्हो यांनी 20 वर्षात काहीच काम केले नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळात निर्माण केलेला एकमेव ‘पांढरा हत्ती’ म्हणजे कला भवन. त्याचे काम आजपर्यंत पूर्णत्वास आलेले नाही. कला संस्कृती खात्याचा सहभाग नसताना या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाची जबाबदारी कुणालाच घ्यायची नव्हती. अगदी कला संस्कृती मंत्र्यानेही जबाबदारी घेण्यास नकार दिला व प्रकल्प पूर्ण करून त्यांच्याकडे सोपवण्यास सांगितले होते. त्यामुळे या प्रकल्पास माझा विरोध होता, अशी माहिती साल्ढाना यांनी दिली.
सांकवाळ सरपंचही त्यांच्या गुरुप्रमाणेच निक्रिय आहेत. तीन वर्षांच्या सरपंचपदाच्या कारकीर्दीत पंचायतघरची पायाभरणी करण्याशिवाय त्यांनीही कोणतेच काम केलेले नाही, असा आरोप साल्ढाना यांनी केला.
कुठ्ठाळी पंचायतीच्या सरपंचांनी तीन वर्षात लोकांसाठी कोणतीही विकासकामे केली नाहीत, अशी टीका साल्ढाणा यांनी केली. ‘मिस्टर कुठ्ठाळी’ आणि ’मिस कुठ्ठाळी’ अशा स्पर्धा आयोजित करणे म्हणजे विकास असतो का, असा सवाल साल्ढाणा यांनी उपस्थित केला आहे. जमीन मिळत नसेल तर लोकांसाठी गृहबांधणी प्रकल्प उभारणे शक्मय होणार नाही, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.