दुसऱया वनडेत भारतावर 51 धावांनी मात
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाने दुसऱया वनडे सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. सलग दुसऱया सामन्यात स्टीव्ह स्मिथने झंझावाती शतक झळकवले आणि तो सामनावीराचा मानकरी ठरला. भारतीय कर्णधार कोहली व केएल राहुल यांची अर्धशतके मात्र वाया गेली.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी घेतल्यावर पहिल्या पाच फलंदाजांनी पन्नासहून अधिक धावा फटकावल्यामुळे 50 षटकांत 4 बाद 389 असा धावांचा डोंगर उभा केला. त्यांची ही भारताविरुद्धची आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. यात स्मिथच्या सलग दुसऱया व भारताविरुद्धच्या पाचव्या शतकाचाही समावेश आहे. त्याने 64 चेंडूत 104 धावा तडकावताना 14 चौकार, 2 षटकार ठोकले. 390 धावांचे कठीण आव्हान भारताला पेलवले नाही आणि 50 षटकांत भारताला 9 बाद 338 धावांपर्यंतच मजल मारता आली. कोहली (89) व केएल राहुल (76) यांनी भरीव योगदान दिले. पण विजयासाठी ते पुरेसे ठरले नाही.
या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन (30) व मयांक अगरवाल (28) यांनी 6.1 षटकांत अर्धशतकी सुरुवात करून दिली. पण आक्रमक फटकेबाजी करण्याच्या नादात धवन बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या कोहलीने चमकदार फलंदाजी करीत शतकाजवळ झेप घेतली होती. पण मोईजेस हेन्रिक्सने मिडविकेटवर घेतलेल्या अफलातून झेलामुळे त्याची खेळी संपुष्टात आली आणि भारताच्या आशेलाही धक्का बसला. त्याने 87 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 89 धावा जमविल्या. तो मैदानावर असताना भारताने 9-10 धावांची गती राखण्याचा चांगला प्रयत्न केला होता.
अष्टपैलू हार्दिक पंडय़ा व केएल राहुल यांनी मोठे फटके मारत संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात राहुल बाद झाला. त्याने 66 चेंडूंच्या खेळीत 5 षटकार व 4 चौकार मारले. तो बाद झाल्याने भारताच्या आशेला मोठा धक्का बसला, त्यातून त्यांना अखेरपर्यंत सावरता आले नाही. निर्धारित षटकांअखेर त्यांना 9 बाद 338 धावांपर्यंतच मजल मारता आली. पॅट कमिन्सने 3, ऍडम झाम्पा व हॅझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
वॉर्नर, मॅक्ववेल, लाबुशाने यांची फटकेबाजी
तत्पूर्वी, स्मिथच्या 104 धावांच्या खेळीव्यतिरिक्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 77 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह 83, कर्णधार ऍरोन फिंचने 69 चेंडूत 60 धावांची खेळी करताना संघाला 23 षटकांत 142 धावांची भक्कम सलामी दिली होती. श्रेयस अय्यरच्या थेट फेकीवर वॉर्नर धावचीत झाल्याने त्याचे शतक हुकले. त्यानंतर मार्नस लाबुशाने व ग्लेन मॅक्सवेल यांनी तुफानी हल्ला करून भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड केल्या. लाबुशानेने 61 चेंडूत 70 तर मॅक्सवेलने केवळ 29 चेंडूत नाबाद 63 धावा झोडपत संघाला पावणेचारशेपारची मजल मारून दिली. मॅक्सवेलने 4 चौकार, 4 षटकार मारले. स्मिथने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना चौफेर टोलेबाजी केली.
हार्दिकला यश
कोणताच गोलंदाज प्रभावी ठरत नसल्याचे पाहून कोहलीने हार्दिक पंडय़ाला गोलंदाजी दिली. पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुमारे वर्षभरानंतर तो पहिल्यांदाच गोलंदाजी करीत होता. त्याने आपल्या शैलीत थोडा बदल केला असून तो आता साईडऑन ऐवजी ओपन चेस्ट पद्धतीने गोलंदाजी करीत होता. शरीरावर जादा ताण पडू नये यासाठी त्याने हा बदल केला आहे. त्याच्या तिसऱया षटकात शमीने स्मिथचा झेल टिपत यश मिळविले.
पहिल्या सामन्यात महागडा ठरलेल्याने बुमराहने निर्धाव षटक टाकत चांगली सुरुवात केली होती. पण नंतर त्याची लयही बिघडली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लय सापडल्यावर त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. त्यामुळे सर्वच गोलंदाजांचे पृथक्करण बिघडले.
तिसरा सामना कॅनबेरा येथे 2 डिसेंबर रोजी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 4 बाद 389 : वॉर्नर 83 (77 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), फिंच 60 (69 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), स्मिथ 104 (64 चेंडूत 14 चौकार, 2 षटकार), लाबुशाने 70 (61 चेंडूत 5 चौकार), मॅक्सवेल नाबाद 63 (29 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), हेन्रिक्स नाबाद 2, अवांतर 7. गोलंदाजी : शमी 1-73, बुमराह 1-79, हार्दिक 1-24, सैनी 7 षटकांत 70, चहल 9 षटकांत 71, जडेजा 10 षटकांत 60, अगरवाल 1 षटकांत 10 धावा).
भारत 50 षटकांत 9 बाद 338 : अगरवाल 28 (26 चेंडूत 4 चौकार), धवन 30 (23 चेंडूत5 चौकार), कोहली 89 (87 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), श्रेयस अय्यर 38 (36 चेंडूत 5 चौकार), राहुल 76 (66 चेंडूत 4 चौकार, 5 षटकार), हार्दिक 28 (31 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), जडेजा 24 (11 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), सैनी नाबाद 10, शमी 1, बुमराह 0, चहल नाबाद 4, अवांतर 10. गोलंदाजी : कमिन्स 3-67, हॅझलवूड 2-59, झाम्पा 2-62, हेन्सिक्स 1-34, मॅक्सवेल 1-34.
कोहलीचा 22000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण
कोहलीने या सामन्यात आणखी एक माईलस्टोन गाठताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22,000 धावांचा टप्पाही पार केला. यासाठी त्याला 78 धावांची गरज होती. 249 वनडे सामन्यात त्याच्या 11,888 तर कसोटी 7240 आणि टी-20 मध्ये 2794 धावा झाल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नर धोंडशिरेची दुखापत
या सामन्यात वॉर्नरने 83 धावांची खेळी करीत दमदार सुरुवात करून दिली. होती. पण भारताच्या चौथ्या षटकावेळी धवनचा फटका अडवताना त्याने सूर मारल्यानंतर धोंडशिर दुखावल्याने त्याच्या मांडीत वेदना होऊ लागल्या. संघाच्या फिजिओचा आधार घेत त्याला मैदान सोडावे लागले. त्याला हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी नेण्यात आले असून त्याच्या अहवालाची ते प्रतीक्षा करीत आहेत. दुखापत तीव्र असल्यास त्यातून बरे होण्यास किमान सहा आठवडे लागतात. त्यामुळे त्याला उर्वरित वनडे सामना, टी-20 मालिका आणि कसोटीतील पहिले तीन सामने हुकण्याची शक्यता आहे.
..अन् त्याला मिळाली मैदानातच लाईफ पार्टनर
भारत व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात क्रिकेट युद्धात गुंतले असताना ईकडे प्रेक्षागारात वेगळेच पण आनंददायक नाटय़ पहावयास मिळाले. सामना पाहणाऱया एका व्यक्तीला त्याची आयुष्याची जोडीदार मिळाली. भारतीय संघाची निळी जर्सी घातलेली ही व्यक्ती भारतीय समर्थक असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याने ऑस्ट्रेलियाची समर्थक असलेल्या युवतीला स्टेडियममध्येच प्रपोज केले आणि तिने ते लाजत मान्य केल्यानंतर दोघांनी एकमेकांना आलिंगन देत आनंद साजरा केला. यावेळी सभोवती असलेल्या प्रेक्षकांनीही टाळय़ा वाजवून त्यांचे अभिनंदन केले. मैदानावरील मोठय़ा स्क्रीनवर हे दृश्य दाखविण्यात आले तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनेही टाळय़ा वाजवून त्यांचे अभिनंदन केले.