नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीपीआयमधून बाहेर पडल्यानंतर आता कन्हैया कुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच गुजरातमधील दलित कार्यकर्ते आणि आमदार जिग्नेश मेवाणीही याच कार्यक्रमात काँग्रेसमध्ये सामील झाले. मंगळवारी दुपारी काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दोघांनीही पक्षप्रवेश केला. त्यानंतर सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल यांनी त्यांना दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे. या व्यासपीठावर दोन तरुण बसले आहेत, ज्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी मोदी सरकार आणि हिटलरशाहीशी सतत लढा दिला आहे. त्यांचा लढा काँग्रेसच्या माध्यमातून अधिक मजबूत होईल, असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.