बेंगळूर/प्रतिनिधी
देशात सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. केंद्राने सर्वांना मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. देशात सरकारी लसीकरण केंद्रासह खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण केलं जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी शुल्क अकरावून लसीकरण केलं जात आहे. दरम्यान कर्नाटकातही खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केलं जात आहे. यासाठी वाढीव शुल्क आकारल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान केंद्राने जाहीर केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कर्नाटक कोविड -१९ मंत्री टास्क फोर्सने राज्यातील खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त शुल्कासाठी सूचित केले आहे. राज्य सरकारने जर रुग्णालयांनी जास्त शुल्क आकारल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
दरम्यान लसीचे दर निश्चित केले असून (दर डोस): कोविशिल्ड-७८० रुपये, कोव्हॅक्सिन – १,४१० रुपये, स्पुतनिक व्ही- १,१४५ रुपये आहेत. “ही किंमत कॅप्स (प्रति डोस १५० रुपये शुल्क आकारणीसह) आतापासून लागू होतील. दरामध्ये विसंगती आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असे टास्क फोर्सचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी सांगितले.