मान्यवर नेते, भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती
बुलंदशहर / वृत्तसंस्था
रामजन्मभूमी आंदोलनाचे आघाडीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्हय़ातील त्यांचे जन्मस्थान नरोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. त्यांचे पुत्र राजवीरसिंग यांनी कल्याणसिंग यांच्या पार्थिवाला प्रथेनुसार अग्नी दिला.
त्यांचे शनिवारी प्रदीर्घ प्रकृती अस्वास्थ्याने निधन झाले होते. नरोराच्या बन्सी घाटावर भारतीय जनता पक्षाचे मान्यवर नेते, असंख्य कार्यकर्ते आणि कल्याण सिंह यांना मानणाऱयांच्या उपस्थितीत हे अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले होते. कणखर हिंदुत्ववादी नेते म्हणून कल्याण सिंह प्रसिद्ध होते. 6 डिसेंबर 1992 या दिवशी कारसेवकांनी अयोध्येत बाबरी मशिदीचे पतन केले. त्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अन्य ज्येष्ठ नेत्यांसमवेत रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व केले. या हे आंदोलन यशस्वी झालेले पाहण्याचे भाग्यही त्यांनी पाहिले.