उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी व्यक्त केलेला विश्वास : फडणवीसांकडून पुढे जाण्याचा सल्ला
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण मतदारसंघात भाजपाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून आपले विरोधक ज्या पद्धतीने अपप्रचार करत आहेत त्याने खचून न जाण्याचा सल्ला आपल्या समर्थकांना काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आपण मागच्या अडीच वर्षांत काणकोण मतदारसंघात अनेक विकासकामे चालीस लावली आहेत. गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली दीर्घकाळ चर्चा झालेली असून त्यांनी आपल्याला पुढे जाण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे आपण निश्चिंत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण आतापर्यंत आठ निवडणुका लढविल्या असून आगामी निवडणूक ही आपली नववी निवडणूक ठरणार आहे. प्रत्येक निवडणुकीचा आपल्याला वेगळा अनुभव असून आपले समर्थक जे आठ वर्षांपूर्वी आपल्याबरोबर होते त्यात किती तरी पटींनी आता वाढ झालेली आहे. जितके उमेदवार या मतदारसंघात उतरतील तितका आपल्याला फायदाच होणार आहे, असे फर्नांडिस म्हणाले.
अनेक विकासकामे मार्गी
मागच्या अडीच वर्षांत काणकोण मतदारसंघात विविध माध्यमांतून एक हजार कोटींची कामे झालेली आहेत. आपल्या सरकारने या कालावधीत 300 कोटी रु. इतका खर्च करून चार रस्ता ते माशेपर्यंतच्या मनोहर पर्रीकर रस्त्याचे काम पूर्ण केले. या रस्त्यावर एकाच वेळी तीन पूल पूर्ण झालेले आहेत. 11 कोटी खर्च करून काणकोण पालिका कार्यालय इमारतीच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. या इमारतीचा पायाभरणी समारंभ कधीच करण्यात आलेला आहे. 2 कोटी खर्च करून कृषी भवन उभारण्यात येणार आहे, तर 11 कोटी खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन ओव्हरहेड टाक्या बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
अंतर्गत रस्त्यांची 23 कोटी इतका खर्च करून सुधारणा करण्यात आली आहे. शेळेर येथील सरकारी उ. मा. विद्यालय, गावडोंगरी, खोतीगाव येथील सरकारी माध्यमिक विद्यालये यांच्या नूतनीकरणाची कामे साधनसुविधा महामंडळामार्फत चालू आहेत. काही कामे पूर्ण झालेली आहेत. वीजपुरवठय़ासाठी किती तरी कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. जीआयए, मनरेगा, ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून पंचायतस्तरावर अनेक कामे हातात घेण्यात आली आहेत. कित्येक वर्षांपासून मागणी होत आलेल्या मार्ली रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, लाडली लक्ष्मी लाभार्थ्यांना कसलेच त्रास होऊ न देता सर्व प्रकारची मदत आपल्या कार्यालयातून दिली जात आहे. या योजनासाठी अर्ज 50 ते 100 रु. देऊन विकत घ्यावे लागतात. मात्र आपल्या कार्यालयातून आपण ते विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत आणि स्वतः पणजीतील कार्यालयांत पोहोचते करून गरजुंना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी याकडे लक्ष दिलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
समर्थकांच्या बळावर लढणार कोविड महामारीच्या काळात या तालुक्यातील आरोग्य केंद्राने भरीव असे कार्य केले. मात्र या तालुक्यातील 89 व्यक्तींचा बळी गेला. त्याचे आपल्याला दुःख आहे. आतापर्यंत 18 वर्षांवरील 32503 जणांनी कोविड लस घेतली आहे. त्यासाठी संपूर्ण तालुक्यात 488 शिबिरे घेण्यात आली. आपण त्याकडे लक्ष दिले, असे सांगून फर्नांडिस म्हणाले की, मतदारसंघातील बारीकसारीक गोष्टींकडे आपले लक्ष आहे. आपले समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळेच आपण या गोष्टी पूर्ण करू शकलो. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक देखील आपण आपल्या समर्थकांच्या बळावरच लढविणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.