सुरक्षा पाहणी झाल्यानंतरच प्रवाशांसाठी प्रारंभ
प्रतिनिधी / बेंगळूर
कारवार आणि मंगळूर शहरादरम्यान नव्याने निर्माण करण्यात आलेल्या रेल्वे विद्युत मार्गावरील चाचणी यशस्वी झाली आहे. सध्या ट्रायल रन व्यवस्था करण्यात आली असून या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी करून हिरवा कंदील दाखविल्यानंतर प्रवासी सेवा प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे निगमने पत्रकाद्वारे दिली आहे.
मंगळूर ते कारवार दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. रविवारी या विद्युत मार्गावरील रेल्वेची चाचणी यशस्वीपणे पार पडली. सकाळी 9.40 वाजता तोकूर येथून निघालेली रेल्वे दुपारी 12.44 वाजता कारवारला पोहोचली. दुपारी 1.40 वा. कारवारहून परत निघालेली रेल्वे सायंकाळी 4 वाजता तोकूर येथे पोहोचली. यंदाच्या जूनमध्ये विद्युतचलित रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
तोकूर आणि कारवारमधील रेल्वेमार्ग कोकण रेल्वे विभागात येतो. या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेच्या 400 कि. मी. लांबीच्या विद्युतीकरणासाठी 1 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मार्गावर मुल्की, मुर्डेश्वर, बारकुरु, सेनापूर आणि जारी उपस्थानके असणार आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱयांनी दिली आहे.
कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी. बी. निगम म्हणाले, कारवार-मंगळूर मार्गावर विद्युतचलित रेल्वे नियमितपणे सोडण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. रेल्वेच्या सुरक्षा आणि देखभाल विभागाकडून पाहणी झाल्यानंतर या मार्गावर विद्युत रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.